Latest Crime News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Molestation

Jalgaon Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला सश्रम कारावास

जळगाव : तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ११ वर्षीय मुलीला घड्याळ देण्याचे बहाणा करून जवळ बोलवून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला जळगाव जिल्हा न्यायालयाने ४ वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा बुधवारी (ता. १६) दुपारी दोनला सुनावली. (Rigorous imprisonment for molesting minor girl Jalgaon Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : हिंगलाजनगर भागात दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू; हत्या की आत्महत्या तपासाचे आव्हान!

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या एका गावात ११ वर्षीय मुलगी परिवारासह वास्तव्याला आहे. १७ जुलै २०१७ ला दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास शाळेत जात असताना, गावातील मनोज सुरेश सोनवणे (वय २७) याने मुलीला घड्याळ देण्याचा बहाणा करून जवळ बोलविले व तिचे तोंड दाबत तिचा विनयभंग केला. याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांच्यासमोर झाली.

सरकार पक्षातर्फे एकूण ६ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि तिची आईची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षी व पुराव्याअंती न्यायालयाने मनोज सुरेश सोनवणे याला दोषी ठरवून विविध कलमान्वये ४ वर्षे सक्तमजुरी आणि १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील चारुलता बोरसे यांनी युक्तिवाद केला. याकामी पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी सहकार्य केले.

हेही वाचा: Chhagan Bhujbal | नाशिकमधील सिडको कार्यालय हलविण्याचा हेतू नेमका काय?; भुजबळांचा सवाल