
गौताळात पर्यटनासाठी गेलेल्या ‘त्या’ १५ पर्यटकांची सुखरूप सुटका
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गौताळा अभयारण्यात पर्यटनासाठी गेलेले चाळीसगाव आणि धुळे येथील पर्यटक सायंकाळी अंधार झाल्याने वाट चुकल्याने जंगलातच हरवले. या अशा स्थितीत मोबाईलची रेंजही येईना. या पर्यटकांनी आपल्या अमळनेर येथील मित्रांना ही आपबित्ती सांगितली. त्या मित्रांनी खासदार उन्मेष पाटील यांना दिल्लीत फोन करताच खासदार पाटील यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ वन विभागाला ही माहिती दिली. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर वन मजुरांच्या सहाय्याने या पर्यटकांचा सुरक्षित शोध लागला. मात्र या पाच तासात या पर्यटकांनी अक्षरश: जीव मुठीत ठेवून जंगलात शेकोटी पेटवून सुटकेची वाट पाहिली. या पर्यटकांच्या शोधासाठी जंगलात घुसलेल्या वन कर्मचाऱ्यांना ती शेकोटी दिसली आणि पर्यटक सुखरूप सुटकेचा थरारही संपला. (Latest Marathi News)
हेही वाचा: De Dhakka च्या टीमशी खास गप्पा
धुळे येथील सागर जगताप, देविदास केदार, दीपक वाघ, रुपेश वाघ, प्रशांत पाटील, मयूर पाटील, कुणाल लाड, जयवंत आहिरराव, कुणाल शेलार, सागर लष्कर, चाळीसगाव येथील राहुल सूर्यवंशी, रोहित अंडागळे, बाळा सुरवाडकर, निखिल निभोरे असे पंधरा जण पाटणादेवी दर्शनाला सोमवारी कालीमठ मार्गे आले होते. सायंकाळी उशीर झाल्याने परत पितळखोरे मार्गे परतत असताना जंगलात रस्ता वाट हरविले.
पर्यटक वाट चुकले
गौताळा अभयारण्य म्हणजे घनदाट जंगल. हे पर्यटक ज्या क्षेत्रात वाट चुकले ते क्षेत्र विषारी सर्प, अस्वल, बिबट व साक्षात वाघप्रवण क्षेत्र. त्यामुळे या पर्यटकांच्या जीवाचा थरकाप उडाला. त्यातच मोबाईलची रेंज केव्हा गायब होईल, हे सांगता येत नव्हते. अशाही स्थितीत या पर्यटकांनी नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातील अमळनेर पंकज चौधरी यांना फोन लागला व त्यांना आपबिती सांगितली. चौधरी यांच्याकडून खासदार उन्मेश पाटील यांचा फोन घेऊन थेट खासदार पाटील यांना फोन लावून अभयारण्यात अडकल्याची माहिती दिली. खासदार पाटील यांनी क्षणाचा विलंब न लावता मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे व वनपरिक्षेत्र अधिकारी देसाई व खासदार पाटील यांचे स्वीय साहाय्यक अर्जुन परदेशी यांना सूचना देत कुठल्याही परिस्थितीत या तरुणांची सुटका करावी, असे सांगितले.
हेही वाचा: गुजरातच्या ठगबाजाकडून जळगावच्या व्यापाऱ्याची फसवणूक
चार तासांनी झाला संपर्क
जंगलात हरवलेल्या पर्यटकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र रेंजचा प्राब्लेम येत असल्याने तब्बल चार तासांनी पर्यटकांशी संपर्क झाला. तेव्हा त्यांनी आम्ही पितळखोरा लेणी परिसरात असून प्रचंड घाबरलो आहोत, आम्ही प्रचंड अंधारात आहोत, आम्हाला वाचवा अशी आर्त हाक दिली.
श्री. ठोंबरेनी सांगितले उपाय...
मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी त्यांना जागचे हलू नका, जवळ माचीस असेल तर शेकोटी करा व त्याच्या अवतीभोवती बसा. शेकोटीमुळे तुमचा शोध लवकर लागेल, असे सांगितले. त्यानंतर दोन वनमजूर कालीमठकडून पितळखोरा लेणीकडे निघाले. अखेर शेकोटीमुळे दोन तासानंतर हे वन कर्मचारी त्या पर्यटकांपर्यंत पोहचले. वन कर्मचारी पोहचताच जीव भांड्यात पडलेल्या तरूणांनी एकमेकांना मिठी मारत देव भेटल्याचा आनंद व्यक्त केला. केवळ दैव बलवत्तर असल्याने आणि पाऊस सुरू नसल्याने रात्र वैऱ्याची असताना हे तरूण सुखरूप परत आले.
Web Title: Safe Escape Of 15 Tourists Who Went For Tourism In Gautala
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..