Jalgaon News: सागर पार्क देतेय मनपाला लाखोचे उत्पन्न; नगरसेवकांचा भाडेवाढीचा ठराव फायदेशीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sagar Park Jalgaon

Jalgaon News: सागर पार्क देतेय मनपाला लाखोचे उत्पन्न; नगरसेवकांचा भाडेवाढीचा ठराव फायदेशीर

जळगाव : महापालिकेचे सागर पार्क मैदान महापालिकेचे खऱ्या अर्थाने उत्पन्नाचे स्त्रोत ठरत आहे. जामनेर येथील मक्तेदाराने कार्यक्रमासाठी ७५ दिवस मैदान बुक केले असून, त्याचे तब्बल १८ लाख ७५ हजार रुपये भाडे महापालिकेला मिळणार आहे.

विशेष म्हणजे यातही स्पर्धा होती. आणखी दोन मक्तेदारही यासाठी स्पर्धेत होते. या उत्पन्नाचे श्रेय खऱ्या अर्थाने नगरसेवकांना जात आहे. त्यांनी प्रतिदिन २५ हजार रुपये भाडे करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात महापालिकेचे सागर पार्क एकमेव भव्य मैदान आहे. महापालिकने या मैदानाकडे उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून कधीही बघितले नाही. प्रत्येक कार्यक्रमासाठी त्याचे भाडे अत्यल्प होते. त्यामुळे त्यातून फारसे काही उत्पन्न येत नव्हते.

मात्र, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी सागर पार्क मैदानातून व्यवसायिकदृष्ट्या उत्पन्न घेण्याबाबत विचार केला. त्या दृष्टीने विविध कार्यक्रमासाठी दर ठरविण्यात आले. यात सामाजिक दृष्टीकोन म्हणूनही विचार करण्यात आला.

मनोरंजनासाठी २५ हजार प्रतिदिन

सागर पार्क मैदानावर जाहीर सभा, मेळावे, धार्मिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा होत असतात. सामाजिक विचार करून मेळावे, धार्मिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धासाठी प्रतिदिन कमी दर आकारण्यात आला. मात्र, मनोरंजन तसेच विवाह सोहळा व जाहीर सभेसाठी प्रतिदिन २५ हजार रुपये भाडे आकारण्याचा प्रस्ताव देण्यात आला. महासभेत तो एकमताने मंजूर करण्यात आला.

प्रंचड प्रतिसाद

सागर पार्क मैदानाचे भाढे वाढूनही त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले. मनोरंजनासाठी सागर पार्क मैदान बुक करण्यासाठी मक्तेदारांची चढाओढ होत आहे. सद्यस्थितीत शाळेच्या सुट्या लक्षात घेऊन या ठिकाणी मनोरंजात्मक कार्यक्रम होत आहेत. त्यासाठी तब्बल तीन मक्तेदार आले होते.

तब्बल ७५ दिवस मैदान बुक करण्यासाठी तिघांची चढाओढ होती. अखेर जामनेर येथील मक्तेदाराने अगोदर रक्कम भरल्याने त्यांना ते देण्यात आले. यामुळे महापालिकेला तब्बल १८ लाख ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

प्रतिदिन २५ हजार रुपयांच्या या नवीन हा तिसरा कार्यक्रम होत आहे. मात्र, भाडेवाढीनंतर प्रथमच सर्वांत जास्त दिवस बुकींग होऊन महापालिकेला उत्पन्न मिळणार आहे. महापालिकेला पर्यायाने जळगावकरांना विकासासाठी ही रक्कम प्राप्त होणार आहे.