Shivsena : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केवळ ‘गाजर’ दाखविले; शिवसेना ठाकरे गट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena Thackeray group protested Chief Minister Eknath Shinde and Guardian Minister Gulabrao Patil

Shivsena : मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केवळ ‘गाजर’ दाखविले; शिवसेना ठाकरे गट

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री (CM) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येउन गेले. मात्र, कापसाला योग्य भाव जाहीर केला नाही. केळीबाबत ठोस निर्णय घेतला नाही.

नुकसानभरपाईची रक्कम देण्याची घोषणा केली नाही. (shivsena Thackeray group blame cm eknath shinde about work in district jalgaon news)

केवळ शेतकऱ्यांना त्यांनी गाजर दाखविले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील दडपशाहीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

येथील पद्ममालय विश्रामगृहात पत्रकार परिषद झाली. जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडीप्रमुख गायत्री सोनवणे, प्रशांत सुरळकर, धनेश गायकवाड, किरण भावसार, बजरंग सपकाळे आदी उपस्थित होते.

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शेतकरी व जनतेच्या मोठ्या अपेक्षा होत्या. आज शेतकऱ्यांच्या घरात कापूस पडून आहे. त्या कापसाला अद्यापही भाव नाही. मुख्यमंत्री त्याबाबत काहीतरी ठोस निर्णय घेतील, अशी अपेक्षा होती.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

मात्र, त्यांनी कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे जनतेची निराशा झाली. आमचे शिवसैनिक निवेदन देण्यासाठी गेले असता, आम्हाला एखाद्या दहशतवादीप्रमाणे वागणूक देऊन पोलिस ठाण्याला नेले.

जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले, की आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेलो असताना, पोलिसांनी आम्हाला मज्जाव केला. वरूनच आम्हाला आदेश आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पालकमंत्री एकप्रकारे दडपशाही करीत आहेत.

आम्ही नौटंकी करीत असल्याचा ते आरोप करतात. मग यापूर्वी ते शिंगाडे मोर्चा काढत होते, त्यावेळी त्यांची नौटंकी होती काय, असा आमचा प्रश्‍न आहे. त्यांच्या या दडपशाहीचा आम्ही निषेध करीत आहोत.