Jalgaon Cotton Crop Rate Hike : जिल्ह्यात कापूसटंचाई, दरात वाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Crop Rates Hike

Jalgaon Cotton Crop Rate Hike : जिल्ह्यात कापूसटंचाई, दरात वाढ!

जळगाव : दिवाळीनंतर कापसाच्या दरात सुधारणा होईल, असे भाकीत ‘सकाळ’ने केले होते. त्यानुसार चांगल्या कापसाला आता आठ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपयांदरम्यान दर मिळत आहे. जिल्ह्यात कापसाची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे जिनिंग व्यवसायिकांनी ७ ते ८ हजारऐवजी आता ८ हजार ६०० ते ८ हजार ७०० रुपये दर देणे सुरू केले आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. (shortage of cotton in district increased rates of cotton jalgaon news)

जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने यंदा २५ ते ३० लाख कापसांच्या गाठीनिर्मितीचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. परतीच्या पावसाने काही प्रमाणात कपाशीचे नुकसान झाले असले, तरी उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळेच ३० लाख गाठींचे उत्पादन घेण्याचा निर्णय खानदेश जिनिंग प्रेसिंग असोसिएशनने घेतला आहे.

दिवाळीपूर्वी परतीच्या पावसाने कपाशीत आर्द्रता निर्माण झाली आहे. यामुळे कपाशीचे भाव कमी झाले होते. सात हजार ते आठ हजारांचा दर कपाशीला होता. दिवाळीनंतर कापसाची आवक वाढेल, असा अंदाज जिनिंगचालकांचा होता. मात्र, बाजारात कापसाला कमी भाव असल्याने कापसाची आवक कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. ज्याठिकाणी दहा हजार गाठी तयार होतील, एवढा कापूस दररोज बाजारात विक्रीस येणे अपेक्षित होते.

त्यापेक्षा कमी म्हणजे दोन ते तीन हजार गाठी तयार होतील एवढाच कापूस बाजारात सध्या येत आहे. शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणावा, यासाठी कापसाचे दर वाढविले आहेत. सध्या चांगल्या कापसाला ८५ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपये दर आहे. हा दर काही दिवसच टिकेल, असे चित्र आहे.

खुल्या बाजारात विदर्भातील कापूस येणे बाकी आहे. उत्पादन खर्चासह नफा सुटत असेल, तरच विदर्भातील शेतकरी कापूस विकतात. विदर्भातील कापूस १५ ते २० दिवसांनी बाजारात आल्यास सध्याच्या दरात घट होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांनी असलेला कापूस काही प्रमाणात विकणे आवश्‍यक आहे. जेणेकरून तोटाही येणार नाही अन्‌ उत्पादन खर्चही भरून निघेल.

हेही वाचा: Nashik : मुंबईच्या वकिलाची हरवलेली बॅग पोलिसांच्या तप्तरतेने परत

आकडे बोलतात...

*दरवर्षी होणाऱ्या कापसाच्या गाठींचे उत्पादन : १८ ते २५ लाख गाठी

*गतवर्षी उत्पादित गाठी : ९ लाख गाठी

*खंडीला मिळालेला दर : ६०

*शेतकऱ्यांना गतवर्षी प्रतिक्विंटल मिळालेला दर : ९ ते १३ हजार

*सध्याचा दर : ८५०० ते ८७००

"चांगल्या कापसाला आठ हजार ५०० ते आठ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव दिला जात आहे. हा दर काही दिवसच टिकेल. कापसाची आवक वाढण्याची आगामी काळात चिन्हे आहेत. यामुळे दरात चढ उतार सुरू असेल. यंदा कापसाचे चांगले उत्पादन झाले असले, तरी हव्या त्या प्रमाणात बाजारात कापूस येत नाही."

-प्रदीप जैन, अध्यक्ष,जिनिंग प्रेसिंग ओनर्स असोसिएशन

हेही वाचा: Tulsi Vivah in ISKCON : इस्‍कॉन मंदिरात तुळशी शाळिग्राम विवाहाचा जल्‍लोष