Latest Marathi News | UKत उच्च शिक्षणाचा ‘शॉटकट’ पोचला थेट कोठडीत; वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

UKत उच्च शिक्षणाचा ‘शॉटकट’ पोचला थेट कोठडीत; वाचा सविस्तर

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कधी काळी कार्यरत डॉक्टरांना उच्च शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमला जायचे होते. त्यासाठी आवश्यक शिफारस पत्रावर अधिष्ठातांची खोटी स्वाक्षरी करून शिफारश पत्राचा बोगस ई-मेल युनायटेड किंगडम येथील विद्यापीठास पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २१ऑक्टोबर २०२० ते २१ मार्च २०२१ या कोरोना काळात विशेष तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. जयंत गोपाळ कार्यरत होते. तेथे काम करीत असताना, त्यांची ओळख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यालयीन वरिष्ठ सहाय्यक संजय पाथरूड यांच्याशी झाली.

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

शासकीय महाविद्यालयातून काम सोडल्यावर डॉ. जयंत गोपाळ यांना उच्च शिक्षणासाठी युनायटेड किंग्डमला जायचे होते. मात्र, तेथील विद्यापीठाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून त्यांच्या नावे शिफारस पत्र आवश्यक होते. काम सोडून गेल्यावर शिफारस पत्र सहजासहजी कोणी देणार नाही, याची कल्पना असताना, डॉ. जयंत गोपाळ यांनी शक्कल लढविली.

थेट जिल्‍हा रुग्णलयाचे कार्यालयीन सहाय्यक संजय पाथरुड यांना अडचण कळविली. पाथरुड याने डॉ. जयंत गोपाळ यांच्यासाठी शिफारस पत्र तयार केले. त्यावर शासकीय शिक्के मारून अधिष्ठाता यांची खोटी स्वाक्षरी केली. बनावट शिफारसपत्र वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी विभागाच्या अधिकृत ई-मेलद्वारे युनायटेड किंग्डम विद्यापीठास पाठविले.

हेही वाचा: Cyber Crime : 5G अपडेट करणं पडू शकतं महागात; वाया जाईल आयुष्यभराची पुंजी

खातेंतर्गत चौकशीत कबुली
घडलेला प्रकार निदर्शनास आल्यावर विद्यमान अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी गंभीर दखल घेत चौकशी समिती नेमली. समितीने तत्कालीन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश नारायण यांच्या अभिप्रायनुसार २३ नोव्हेंबरला अहवाल सादर केला. त्यावरून अधिष्ठाता गोपाल ठाकूर यांच्या सुचनेनुसार डॉ. जितेंद्र सुरवाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस वंदना राठोड तपास करीत आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : पार्टीसाठी मित्र आले घरी अन् झाली साडेपाच लाखांची चोरी