
Jalgaon News: घरात वडिलांचा मृतदेह, दु:खावर फुंकर घालत त्याने लिहिला पेपर
नगरदेवळा (ता. पाचोरा) : दहावीचा आज इतिहासचा पेपर होता. सरदार एस. के. पवार विद्यालयाचा विद्यार्थी साई याचे वडील बाबुलाल लोटन कोळी यांचे गुरुवारी (२३) सकाळी सातला अल्प आजाराने निधन झाले.
घरात दुःखाचा डोंगर कोसळला घरातील कर्ता करविता बापच सर्वांना सोडून गेला असल्याने सर्वत्र दु:खाचे वातावरण. मात्र, अशाही परिस्थितीत दु:खावर फुंकर घालत साई कोळी या विद्यार्थ्याने दहावीचा पेपर लिहिला.
वडिलांच्या अंत्यविधीची वेळ सकाळी दहाची दिलेली. त्या वेळी साईला कळाले त्याने नातेवाईक मंडळींना आपला पेपर असल्याचे सांगितले. तेव्हा उपस्थित मंडळींनी अंत्यसंस्काराची वेळ एकची केली. पेपर द्यायला साई परीक्षा केंद्रात आल्यावर शिक्षकवृंदांनी ही बाब प्राचार्य व्ही. बी. बोरसे यांच्या लक्षात आणून दिली.
सर्वांनी साईला धीर देत सांत्वन केले. एक वाजून दहा मिनिटांनी पेपर संपला, तोपर्यंत अंत्ययात्रेची तयारी होत साईने जन्मदात्याला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत दुपारी दीडला अग्निडाग दिला. त्या मुळे या घटनेची व साईच्या धैर्यांची सर्वत्र चर्चा होती.