२८० कोटींचा निधी तापी महामंडळास लवकरच मिळणार | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Jayant Patil

२८० कोटींचा निधी तापी महामंडळास लवकरच मिळणार

जळगाव : सिंचनाची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी तापी महामंडळास २८० कोटी रुपये पुरवणी मागण्यांतर्गत मंजूर करण्यात येणार आहेत, तसेच चाळीसगाव तालुक्यातील चितेगाव, मुंदखेडा, ओढरे, कोदगाव धरणग्रस्त शेतकरी यांचा शेतजमीन मोबदला आठ दिवसांत देण्यात येईल, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली.

चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण व पंचायत समिती गटनेते संजय पाटील व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्याने जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत बैठक झाली. गिरीश महाजन जलसंपदामंत्री असताना चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व शासनात समन्वयातून मध्यममार्ग काढत टप्प्याटप्प्यात निधी देण्याचे ठरले होते. या बदल्यात शेतकऱ्यांनी आपले कोट्यवधीचे व्याजदेखील शासनाला सोडले होते.

मात्र, नंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि दोन वर्षांत ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना एक रुपयादेखील शासनाने दिला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली व त्यांनी जळगाव येथे आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणाला माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन व जिल्ह्यातील भाजप लोकप्रतिनिधी यांनी भेट दिली व महाजन यांनी जलसंपदामंत्री यांना फोन करून आमरण उपोषणाची माहिती दिली. त्या वेळी जयंत पाटील यांनी १२ तारखेला मुंबई येथे बैठक घेऊन मार्ग काढतो, असे सूचित केले होते. बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, पातोंडा येथील प्रभाकर पवार, छोटू पाटील, जितेंद्र येवले, सुखदेव शिंपी, मुरली अहिरे, गजानन माळी, दिलीप पाटील, पांडुरंग माळी, अशोक वाबळे, बी. ओ. पाटील, चितेगाव येथील निवृत्ती कवडे, राजेंद्र कवडे, भगवान भोसले, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

आठ दिवसांत सर्व आढावा पूर्ण करणार

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सर्व बाबींची पूर्तता करून आठ दिवसांत सर्व आढावा पूर्ण करून नियोजन विभाग आणि अर्थ विभागाशी बैठक घेऊन शेतकऱ्यांना मोबदला देण्याची सोय करण्याची ग्वाही दिली. तत्काळ उपाययोजना म्हणून पुरवणी मागणी मांडून २८० कोटी रुपये तापी महामंडळास उपलब्ध करून शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचा शब्ददेखील जलसंपदामंत्री यांनी या वेळी गिरीश महाजन, मंगेश चव्हाण व शेतकऱ्यांना दिला.

loading image
go to top