
बाँडचा एक बॉक्स खरेदी करून एकाच वेळी ओढला जातो. त्याच्या नशेत गुन्हे करून रात्रभर ते नशेत राहतात. सकाळी उठल्यावर छातीत वेदना होतात.
जळगाव ः शहरात आठ दिवसांत सतत होणाऱ्या जबरी लुटीच्या घटनांचा स्थानिक गुन्हेशाखेने छडा लावला असून, दोन अल्पवयीन संशयितांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिजित पाटील (वय १९) असे संशयिताचे नाव आहे.
आवश्य वाचा- तर..अशा संबंधांना ‘राजमान्यता’ मिळण्याचा धोका!
अभिजित राजपूत-पाटील (वय १९, रा. चौगुले प्लाट) याला ताब्यात घेतले. त्याची रात्रभर चौकशी केल्यावर त्याने एम. जे. कॉलेजमागे राजेश सोनार यांचा मोबाईल हिसकावल्याचे सांगितले. साथीदारांचे नाव सांगितले, तर ते मला जिवंत ठेवणार नाही, अशी भीती होती. त्याच्या खिशात नुकतीच घेतलेली नवी कोरी अंगठी सापडली. प्रेयसीला देण्यासाठी त्याने ही अंगठी जबरी लुटीच्या गुन्ह्यात हिस्सेदारीतून घेतली होती. पोलिसांनी विश्वासात घेतल्यावर त्याने माया व छोटा माया अशा दोघांचे नाव घेतले. पथकाने दोघांना ताब्यात घेतल्यावर एका मागून एक आठ गुन्ह्यांची सरबत्तीच लागली असून, तीन गुन्ह्यांतील ऐवज त्यांनी काढून दिला.
यांचे पथक, अशी कारवाई
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात सीसीटीव्ही फुटेज गोळा करून शोध सुरू होता. गुन्हेशाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, अनिल बडगुजर, संदीप परदेशी, रवींद्र गिरासे, विजय पाटील, दिनेश बडगुजर, सुनील दामोदरे, प्रदीप पाटील, नरेंद्र वारुळे, विजय श्यामराव यांच्या पथकाने पाळत ठेवत अभिजित पाटील याला ताब्यात घेतल्यावर माया गँगचा उलगडा झाला. शहरात अनेक मोठे गुन्हे या टोळीमार्फत झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
आवर्जून वाचा- सलग चौथा दिवस; भररस्त्यावर दुचाकीवरून येत मोबाईल हिसकावून सुसाट
चित्रपटाचा प्रभाव
माया गँगचा म्होरक्या सतरा वर्षांचा असून, त्याची परिसरात प्रचंड दहशत आहे. अपूर्वा लाखिया दिग्दर्शित चित्रपट शूट आउट ॲट लोखंडवाला (वर्ष- २००७ मध्ये प्रदर्शित) सलग अडीचशे वेळा बघितल्याने चित्रपटातील हिरो (विवेक ओबेरॉय) सारखे कपडे, केशरचना, हातात कडे, बोलण्याची ढब तशीच, गल्लीत व परिसरात दांडगाई करत असल्याने त्याचे नावच माया भाय ठेवले गेले. त्याचे अनुकरण करणाऱ्या साथीदाराचे नाव छोटा माया या दोघांच्या व्यतिरिक्त इतरही त्यांचे साथीदार आहेत.
बाँडच्या नशेने ‘जेम्स बाँड’
पंक्चर जोडण्यासाठी वापरातील फेव्हिस्टिकसारखे बाँड ओढण्याची या गँगला नशा असून, रोज अडीचशे रुपयांत २२ नग बाँडचा एक बॉक्स खरेदी करून एकाच वेळी ओढला जातो. त्याच्या नशेत गुन्हे करून रात्रभर ते नशेत राहतात. सकाळी उठल्यावर छातीत वेदना होतात, किडन्या दुखतात, परत सायंकाळची वाट पाहून नशा ओढल्यावर तोच आपला धंदा असेही निर्लज्जपणे तिघे माहिती देताना सांगतात.
संपादन- भूषण श्रीखंडे