
थंडीचा जोर वाढल्याने शहरातील नागरी वस्त्या आणि व्यापारी संस्थाने, मार्केट परिसरात चोरट्यांचा धाक निर्माण झाला आहे.
जळगाव : शहरातील विविध तीन ठिकाणे निवडून चोरट्यांनी बंद घरे फोडल्याचा प्रकार समोर आला. गणेश कॉलनीत बंद घरातून टीव्ही, लॅपटॉपसह ५० हजार, गणपतीनगरातील वृद्धाचे घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांचा ऐवज आणि खोटेनगरातून लहानग्यांच्या पिगी बँकेसह दहा हजारांची रोकड लंपास केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
आवश्य वाचा- मलनिस्सारण, भुयारी गटारांचे काम वेगात; दररोज ४२ दशलक्ष लिटर पाणीनिर्मिती
पहिल्या घटनेत, गणेश कॉलनी (प्लॉट नं. ७१/१) येथे संगीता जोशी या मुलगी भारती जोशीसह वास्तव्यास आहेत. जोशी यांची मुलगी भारती ही बाहेती महाविद्यालयात एस.वाय.बी.कॉम.चे शिक्षण घेत आहे. भारती व तिची आई संगीता असे दोघेही मोठ्या बहिणीच्या प्रसूतीसाठी नाशिक येथे गेल्या होत्या. अशातच लॉकडाउन लागल्याने संगीता मुलीकडेच मुक्कामी होत्या, तर मुलगी भारती २१ डिसेंबरला आजोबा विलास कुळकर्णी यांच्यासोबत घरी परतली. या वेळी घराच्या मुख्य गेटचे कुलूप तुटलेले आढळले.
असा ऐवज लंपास
खिडकीतून आत प्रवेश करत चोरट्यांनी २५ हजार रुपयांचा ३२ इंची एलईडी टीव्ही, २५ हजारांचे लॅपटॉप, तसेच पंजाब नॅशनल बँक व युनियन बँकेचे सर्टिफिकेट चोरून नेल्याचे आढळले. याबाबत भारती जोशी हिने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल झाला आहे.
महत्वाची बातमी - ग्रामपंचात निवडणुक रणधुमाळी: जळगाव जिल्ह्यात आजपासून अर्ज भरण्याच प्रक्रिया
गणपतीनगरात घरफोडी
गणपतीनगरातील वैभव स्टेट बँक कॉलनी परिसरातील पायोनियर क्लबसमोर कांतिलाल वर्मा (वय ७१) घरात एकटेच राहतात. सकाळ आणि सायंकाळी ते जेवणासाठीचा डबा घेण्यासाठी मुलाच्या घरी जातात, मंगळवारी (ता. २१) ते साडेबाराला घर बंद करून गेले. लगेच दुपारी १.२५ च्या सुमारास ते डबा घेऊन परत आले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा ५० हजारांचा ऐवज लंपास केला. वर्मा यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
खाटेनगरात बंद घर फोडले
जे. के. सीड्स कंपनीत एरिया मॅनेजर नितीनकुमार महाले (वय ३७) शुक्रवारी सकाळी दहाला खोटेनगरातील घराला कुलूप लावून कामावर गेले. त्यानंतर ते एरंडोल ते जळगाव असे अपडाउन करत होते. दरम्यान, सोमवारी सायंकाळी सहाला त्यांच्या घरमालकांनी घरफोडी झाल्याने महाले यांना कळविले. त्यानुसार महाले यांनी घरात येऊन पाहणी केली असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटामधील ठेवलेली दहा हजार रुपयांची रोकड आणि लहान मुलांच्या मनी बँकेची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्यांनी सोमवारी रात्री तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.
चोरटे सक्रिय
थंडीचा जोर वाढल्याने शहरातील नागरी वस्त्या आणि व्यापारी संस्थाने, मार्केट परिसरात चोरट्यांचा धाक निर्माण झाला आहे. थंडीत घरफोड्या आणि दरोड्यांच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे