मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरीचा सुरू केला धंदा; हाणामारी केली आणि पोहचले तुरूंगात  

रईस शेख
Wednesday, 20 January 2021

दोघेही लक्झरी बसने पळून जाण्याच्या बेतात असताना रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने त्यांच्यावर रात्री उशिरा झडप घातली.

जळगाव ः शहरातील देवरामनगर निमखेडी रोडावर दोघा तरुणांनी एकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तालुका पोलिसांनी त्याची तक्रारही दाखल करून घेतली. मात्र, प्रभात कॉलनीतून चोरलेल्या दुचाकीसह इतर गुन्ह्यात सहभाग असल्याच्या गुप्त माहितीवरून रामानंदनगर पोलिस रुग्णालयात धडकले. तत्पूर्वीच चाहूल लागल्याने साथीदारासह दोघे पळून गेले. शहर सोडून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी अटक केली. संशयिताला न्यायालयाने कोठडीत रवाना केले आहे. 

आवश्य वाचा- खोदा पहाड निकला चुहा.. राज्यातील सैनिकी शाळेतील आदिवासी तुकडीवरील शिक्षकांची स्थिती
 

प्राप्त माहितीनुसार भावेश पाटील व त्याचा लहान भाऊ यांनी औरंगाबादच्या तरुणांकडून दुचाकी (एमएच १९, बीवाय ३६४८) घेतली होती. पैसे दिले नाही, तसेच दुचाकी आम्ही विकून देतो, असे सांगून टाळाटाळ केल्याने वाद होऊन दोघा भावंडानी दुचाकी देणाऱ्या लखन याला मारहाण केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात रविवारी (ता. १७) गुन्ह्याची नोंद झाली. जखमी उपचार घेत असतानाच, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांना गुप्त माहिती मिळाली व याच चोरट्यांनी रिक्षाची बॅटरही लंपास केल्याची माहिती आल्याने शोध सुरू होता. पथकातील संजय सपकाळे, ललित भदाणे, रवी चौधरी, प्रवीण जगदाळे अशांनी रुग्णालय गाठले. मात्र, तोपर्यंत जखमी फरारी झाला होता. गुन्ह्यातील त्याचा साथीदार, स्वप्नील ऊर्फ सोमनाथ मोरे (वय २० रा. रांजणगाव, ता. गंगापूर, औरंगाबाद) याने जखमीला सोबत घेत पोबारा केला. दोघेही लक्झरी बसने पळून जाण्याच्या बेतात असताना रामानंदनगर पोलिसांच्या पथकाने त्यांच्यावर रात्री उशिरा झडप घातली. 

आवश्य वाचा- अरेच्चा ! जळगाव जिल्ह्यातील ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला दिला नकार
 

शिक्षण घेणाऱ्या तरुणांना लावली चटक 
नववी, दहावी आणि अकरावीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांमध्ये दुचाकी वाहनांची क्रेज असते. परिणामी, अशा तरुणांशी मैत्री करून औरंगाबादेतून चोरून आणलेली वाहने जळगाव शहर वगळता खेडोपाडी मिळेल त्या किमतीत विकून मौजमजा करायचा धंदा या तरुणांनी सुरू केला आहे. मात्र, स्वप्नील व त्याचा अल्पवयीन साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले. जळगाव प्रभात कॉलनीतील मनोज दांडेकर यांची दुचाकी, तसेच महेंद्र पाटील यांच्या ऑटो रिक्षाची बॅटरी संशयितांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theft marathi news jalgaon two wheeler thief arrested police