Cotton Crop Rate : पांढऱ्या सोन्याने केले शेतकऱ्यांना उणे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton Crop News

Cotton Crop Rate : पांढऱ्या सोन्याने केले शेतकऱ्यांना उणे!

श्यामकांत पाटील : सकाळ वृत्तसेवा

गोवर्धन (जि. जळगाव) : गेल्या वर्षी कापसाला समाधानकारक भाव मिळाले होते. यंदाही चांगला भाव मिळेल, या अपेक्षेने शेतकर्‍यांनी कापूस (Cotton) लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. मात्र, यंदा भावाबाबत शेतकऱ्यांची घोर निराशा झाली.

परिणामी, पांढरे सोने म्हणवले जाणारा कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाले असून, आर्थिक कोंडीत सापडला आहे. (This year farmers did not get remunerative price of cotton they were deeply disappointed jalgaon news)

गेल्या दोन वर्षांपासून कापसाची तालुक्यात पेरणी कमी असली तरी भाव मात्र, चांगले तेजीत होते. गेल्या वर्षी १२ हजार क्विंटलपर्यंत भाव पोचले होते. या आशेवर शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली असून, तालुक्यात सुमारे ५३ हजार हेक्टरवर कापूस लागवड झाली.

कापसावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा खर्च झाला. वाढती मजुरी, बियाणे, खते आदींवर मोठा खर्च झाला. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नऊ हजारापर्यंत भाव होता. मात्र, त्यावेही कापूस हातात नसल्याने शेतकरी चिंतीत होते. सद्यस्थितीत सात हजार रूपये क्विंटलच्या वर भाव नसल्याने शेतकऱ्यांचा कापूस हा घरातच पडून आहे.

आज ना उद्या चांगला भाव मिळेल मग कापूस विक्रीस काढून या आशेवर शेतकरी आहेत. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे कापूस वेचणीसही शेतकऱ्यां उशीर झाला. परिणामी सुरवातीला आठ हजार रूपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला. नंतर कापसाचे भाव कमालीचे पडल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शासनााकडूनही ग्रेडनुसार कापूस खरेदी करण्यात येते. मात्र, शासनाचा हमीभाव कमी असल्याने शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांना विकण्यावर भर असतो. यंदा सुरवातीला भाव चांगला असला तरी कापूस पुरेसा नसल्याने शेतकऱ्यांना हवा तो भाव मिळू शकला नाही. परिणामी, शेतकरी कमालीचे हताश झाले असून, आर्थिक कोंडीत अडकले आहेत.

बेमोसमी पावसानेही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली. जेमतेम तोंडाशी आलेला घासही भाव नसल्याने हिरावल्याने शेतकऱ्यांना आता करावे काय हा प्रश्‍न पडला आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. इतरत्र पिके घेण्यातही मोठ्या अडचणी शेतकर्‍यांना निर्माण झाल्या आहेत.

"अमळनेर तालुक्यात यंदा ५३ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली होती. गेल्या वर्षी भाव चांगले असल्याने यंदा कापसाची लागवड वाढली होती. दरवर्षी कापसाचे भाव हे कमी जास्त होत असतात. परंतु शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन इतर पीक लागवडीकडे भर द्यायला हवा." - योगेश वंजारी, कृषी सहायक.

या वर्षी चांगला भाव मिळेल व विविध बँका सोसायटीच्या कर्जातून मुक्त होऊ या आशेवर कापूस लागवड केली. व्यापारीही आता कापूस घेण्यास धजावत नाही. परिणामी घरातच कापूस पडून आहे. शेतीवरच आमचे घर अवलंबून आहे. आता पुढे कसे करावे ही विवंचना सतावत आहे.

- सुशीलकुमार पाटील, शेतकरी नीम.