Jalgaon News : अभय शास्ती योजनेचा आज शेवटचा दिवस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhay Shasti Yojana

Abhay Yojana : अभय शास्ती योजनेचा आज शेवटचा दिवस!

जळगाव : शहरातील नागरिकांकडे मिळकतीच्या थकबाकीवरील व्याज व दंडमाफीसाठी असलेल्या अभय शास्ती योजनेस (Abhay Yojana) जळगावकरांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. (Today is the last day of Abhay Shasti Yojana Jalgaon News)

सोमवारी (ता. २७) तब्बल २ कोटी ३१ लाखांची विक्रमी वसुली झाली. महापालिकेने जाहीर केलेल्या या योजनेचा मंगळवारी (ता. २८) शेवटचा दिवस आहे.महापालिकेने मिळकतींच्या थकबाकी वसुलीसाठी नागरिकांना व्याज व दंड आकारणीत माफी देण्यासाठी ‘अभय शास्ती’ योजना जाहीर केली आहे.

शहरातील नागरिकांनी या योजनेस प्रचंड प्रतिसाद दिला आहे. सोमवारी घरपट्टी भरण्यासाठी महापालिका व प्रभाग समितींच्या कार्यालयात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या संगणक सर्व्हरवर ताण आला होता.

त्यामुळे सर्व्हर बंद पडले होते. मात्र, अर्धा तासाने सुरू झाले. सोमवारी तब्बल ३० लाख रुपयांचा ऑनलाईन भरणाही प्राप्त झाला. एकूण तब्बल २ कोटी ३१ लाखांची विक्रमी वसुली सर्व प्रभागांत झाली.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

सोमवारची प्रभागनिहाय वसुली अशी : प्रभाग समिती क्रमांक १- ६६ लाख १७ हजार, प्रभाग समिती क्रमांक २- ३९ लाख ९२ हजार, प्रभाग समिती क्रमांक ३- ५७ लाख २० हजार, प्रभाग समिती क्रमांक ४- ३५ लाख ७१ हजार, तर मोबाईल टॉवरचा ३२ लाख रुपयांचा भरणा झाला.

१२ कोटींची वसुली

महापालिकेने जाहीर केलेल्या ‘अभय शास्ती’ योजनेचा मंगळवारी (ता. २८) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे कर भरणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे महालिकेतर्फे सांगण्यात आले. या योजनेतून महापालिकेला आतापर्यंत १२ कोटी ९२ लाख रुपये मिळाल्याचे सांगण्यात आले.

"अभय शास्ती योजनेमुळे नागरिकांचा ३० ते ६० टक्के रकमेचा फायदा होत आहे. नागरिकांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मंगळवारी या योजनेचा शेवटचा दिवस आहे. नागरिकांनी आपल्या मिळकतीची थकबाकी त्वरित भरावी. या योजनेला मुदतवाढ मिळणार नाही." -डॉ. विद्या गायकवाड, आयुक्त, महापालिका, जळगाव