सुसाट ट्रकने दोन पिक-अप व्हॅन चिरडल्या; चौघांचा मृत्यू, 14 जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident news

सुसाट ट्रकने दोन पिक-अप व्हॅन चिरडल्या; चौघांचा मृत्यू, 14 जखमी

जळगाव : फैजपूर येथील आठवडेबाजारात शेळ्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोन पिक-अप व्हॅनला भुसावळकडून येणाऱ्या सुसाट ट्रकने ओव्हरटेक करताना समोरून धडक दिली. यामुळे अपघातग्रस्त (accident) वाहनांच्या टपवर बसलेल्यांसह चौघे थेट पुलावरून खाली फेकले गेल्याने जागीच मृत्युमुखी (Death) पडले. पहाटे साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. यात इतर १४ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (truck crushed 2 pickup vans 4 killed 14 injured jalgaon accident news)

फैजपूर येथील आठवडेबाजारासाठी भडगाव आणि जामनेर तालुक्यातील व्यापारी आणि पशुपालक निघाले होते. भडगाव येथून बोलेरो पिक-अप (एमएच ४३, बीबी ००५०) आणि पळासखेडा-मिराचे (ता. जामनेर) येथील (एमएच ४३, एडी १०५१) या दोन्ही पिक-अपमध्ये १६ जण सहा ते सात शेळ्यांसह प्रवास करीत होते. सकाळी ६.५० च्या सुमारास ट्रक (एमएच ०९, एचजी ९५२१) भुसावळकडून जळगावकडे सुसाट येत होता. भादली रेल्वे उड्डाणपुलावर या ट्रकने पुढे असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या भडगावच्या पिक-अप व्हॅनला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती, की पिक-अपच्या टपावर बसलेले नईम अब्राहम खाटीक (वय ६५, रा. तांबापुरा), अकील गुलाब खाटीक (५६, रा. फैजपूर), फारूख खाटीक (४५, रा. भडगाव), जुनेद सलीम खाटीक (१८, रा. भडगाव) असे चारही जण व्हॅनमधून खाली फेकले गेले. जबर मार लागल्याने जागीच मृत्युमुखी पडले. दोन्ही पिक-अपचा चेंदामेंदा करून ट्रक पुलाच्या कठड्यावर चढला होता. यावरून त्याच्या गतीचा अंदाज यावा.

क्षणार्धात दुसऱ्या व्हॅनला धडक

पुढच्या पिक-अपला धडकून चालक सावरत नाही तोवर, मागे असलेली दुसरी पिक-अप व्हॅन (एमएच ४३, एडी १०५१) हिलाही त्याच ट्रकने धडक देत जागेवरच चक्काचूर केला. एकामागून एक अशा दोन व्हॅनला धडकून झालेल्या या अपघातात १४ जण जखमी झाले. त्यांपैकी दोघे चालक गंभीर आहेत.

जखमींची नावे

अपघातात ट्रकचालक वसंत रामहरी देऊळकर (५५, रा. अकोला), पिक-अप व्हॅन चालक रसूल कुरेशी (रा. भडगाव), दुसरा चालक प्रकाश पंढरीनाथ शिंदे (४३, रा. पळासखेडा मिराचे), संतोष दौलत धनगर (६०, रा. नेरी), सलीम गुलाब खाटीक (५०, रा. नशिराबाद), मुश्ताक हाजी बिस्मिल्ला (४७, लोहारा, ता. पाचोरा), अब्दुल रज्जाक खाटीक (४६, नशिराबाद), हनीफ खाटीक (४०), लियाकत बाबू खाटीक (४८), शेख सलीम शेख मेहबूब खाटीक (४६, रा. भडगाव), शाकीर खाटीक, इरफान खाटीक, जुबेर खाटीक असे पिक-अप व्हॅनमधून प्रवास करणारे जखमी झाले आहेत. अकरा जखमींवर जळगाव खुर्दच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. इतरांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

हेही वाचा: मासे पकडण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

कुटुंब, नातेवाइकांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच मृत आणि जखमींच्या नातेवाइकांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. डॉ. पाटील रुग्णालयात नातेवाइकांची मोठी गर्दी एकवटली होती. मृतांच्या नातेवाइकांनी जिल्‍हा रुग्णालयात गर्दी केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून अपघाताची माहिती जाणून घेतली.

हेही वाचा: संजय राऊतांना वेळेवर चुना लावीन : गुलाबराव पाटलांचा टोला

Web Title: Truck Crushed 2 Pickup Vans 4 Killed 14 Injured Jalgaon Accident News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top