Jalgaon Accident News: सुसाट ट्रकने वकिलास चिरडले; मानराज पार्कजवळ तासभर जखमी पडून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Accident news

Jalgaon Accident News: सुसाट ट्रकने वकिलास चिरडले; मानराज पार्कजवळ तासभर जखमी पडून

जळगाव : राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळील कार शोरूमसमोर अनोळखी वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले. ही घटना गुरुवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मृत वकील तब्बल तासभर महामार्गावरच पडून असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळाले.

परिसरातील माजी नगरसेवकाने रुग्णवाहिकेतून मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविला. ॲड. विवेक पाटील (वय ३५, रा. धरणगाव), असे मृताचे नाव असल्याचे पोलिसांनी ओळख पटविल्यावर स्पष्ट झाले.

धरणगाव येथील रहिवासी ॲड. विवेक प्रकाश पाटील जिल्‍हा न्यायालयात वकिली करतात. जळगाव ते धरणगाव दुचाकीने ते दररोज ये-जा करतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते जळगावला आले होते. कामाच्या व्यापामुळे गुरुवारी उशीर झाल्याने रात्री साडेआठच्या सुमारास ते त्यांच्या दुचाकी (एमएच १९, सीएच १३९६)ने धरणगावला निघाले.

राष्ट्रीय महामार्गावर मानराज पार्कजवळील कार शोरूमसमोरच ॲड. पाटील यांच्या दुचाकीला समोरून सुसाट वेगात येणाऱ्या वाळू डंपर (एमएच ०४, एसएस २०१४) जोरदार धडक दिली व पसार झाला. या अपघातात ॲड. विवेक पाटील जागीच ठार झाले. ॲड. विवेक पाटील यांच्या पश्चात सहा महिन्यांची मुलगी, पत्नी आणि आई, असा परिवार आहे.

मदतीपेक्षा बघ्यांची गर्दी

अपघात जखमी झालेले वकील महामार्गावर तब्बल तासभर पडून होते. अपघातामुळे दोन्ही बाजूची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. जवळपास दोन्ही बाजूस तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

परिसरातील माजी नगरसेवक अमर जैन यांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेसह पोलिसांना पाचारण केले. रात्री सव्वानऊच्या सुमारास मृतदेह जिल्‍हा रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पोलिस महामार्गावरील वाहतूक सुरळीत करीत होते.

दर्शनी फलक, दिवे लावावे

राष्ट्रीय महामार्गावर पथदीप पूर्णपणे सुरू नाहीत, तसेच फलक नाहीत. रात्री दुचाकीस्वारांना जिवावर खेळूनच वाहने चालवावे लागते. याबाबत महामार्ग प्राधीकरणाला वारंवार सूचना देऊनही उपयोग होत नसल्याचे अमर जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonaccidentdeath