Jalgaon News : अंगावर वीज कोसळून वरखेडेतील तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon News : अंगावर वीज कोसळून वरखेडेतील तरुण ठार

मेहुणबारे (जि. जळगाव) : चाळीसगाव तालुक्यात शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) कहर केला. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.

त्यात अनेक गावांमध्ये रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. (unseasonal rain youth from Varkheda was killed by lightning jalgaon news)

दरम्यान, वरखेडे बुद्रूक (ता. चाळीसगाव) येथे अंगावर वीज कोसळून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला तर महिला देखील जागेवर कोसळली. सुदैवाने महिला बचावली. वरखेडे (ता. चाळीसगाव) येथे भुरा भास्कर पवार (वय ३०) हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांचे कुटुंब व शालकांचे कुटुंब असे गावोगावी पांचाळाचे काम करून उदरनिर्वाह करतात.

गेल्या चार दिवसांपासून ते वरखेडे खुर्द गावी आले होते. वरखेडे बॅरेजच्या जवळ सार्वजनिक जागी त्यांचा पाल होता. दरम्यान, शुक्रवारी (ता.१७) दुपारी अडीचला पालच्या ठिकाणी ताडपत्री टाकण्याचे काम करीत असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वीज कडाडल्याने भुरा पवार हे जागेवरच कोसळून बेशुद्ध पडले तर त्यांची पत्नी मनीषा भुरा पवार या देखील जागेवरच कोसळल्या.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

सुदैवाने त्या बचावल्या तर भुरा पवार हे काहीही हालचाल करीत नसल्याने वरखेडे गावातील लोकांच्या मदतीने त्यांना तत्काळ वाहनाने मेहुणबारे येथे खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह मेहुणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला.

या घटनेने पवार कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मृत तरुणाच्या कुटुंबीयांना गावातील पोलिस पाटील रोहिदास जगताप, पीनल पवार, दीपक राजपूत, जगदीश राठोड, खुशाल गवारे, आबा कच्छवा आदी तरुणांनी मदत केली व मृत तरुणावर वरखेडे येथेच अंत्यविधी करण्यात आला.