Jalgaon News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death news

Jalgaon News : कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

कजगाव (जि. जळगाव) : येथील रहिवासी व अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. मृत शेतकरी नरेंद्र भिकन पाटील यांनी सोमवारी (ता. १३) सकाळी अकराच्या सुमारास स्व:ताच्या शेतात विषप्राशन केले. (Farmer commits suicide due to debt kajgaon jalgaon news)

दरम्यान, त्यांना तत्काळ उपचारासाठी चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु शनिवारी (ता. १८) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. येथील जुनेगाव परिसरातील पवारवाड्यात राहणारे नरेंद्र पाटील या चाळीस वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली.

नरेंद्र यांच्याकडे एक एकर शेती असून, त्यांच्या उपजीविकेचे शेती हे एकमेव साधन होते. मात्र शेतीवर उपजीविका भागत नसल्याने ते रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करीत होते, तसेच शेतीवर घेतलेले विकास सोसायटी, बचत गट व अन्य स्वरूपातील कर्ज फेडण्यात अपयश येत असल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे नरेंद्र पाटील हे चिंताग्रस्त झाले होते.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कुठलीच शक्यता डोळ्यासमोर दिसत नाही, हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, शेती उत्पादनांना भाव नाही, अशी अनेक संकट समोर असल्याने गेल्या काही दिवसांपासून ते चिंताग्रस्त झाले होते.

अखेर हताश होऊन त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतला. गावात एका कष्टकरी तरुण शेतकऱ्यांची अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकरी नरेंद्र पाटील यांच्या पश्चात पत्नी, दहा व आठ वर्षांची दोन लहान मुले आहेत.

टॅग्स :JalgaonFarmerdeathloans