जळगाव जिल्ह्यातील ३९४ गावांना पाणीटंचाईची शक्यता 

देविदास वाणी
Thursday, 4 March 2021

आगामी काळात तापमानात वाढ झाल्यास संभाव्य टंचाई कोठे जाणवेल, याचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात १२९ टक्के पाऊस झाल्याने पाणीटंचाई नसल्यागत स्थिती आहे. दर वर्षी डिसेंबरपासूनच टँकरची मागणी सुरू होते. मात्र, यंदा चांगल्या पावसामुळे पाणीटंचाई दूरच आहे. असे असले, तरी जिल्ह्यात ३९४ गावांना संभाव्य टंचाई जाणवू शकते, असे गृहित धरून दोन कोटींचा टंचाई आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. 

आवश्य वाचा- जळगावातील १४ व्यापारी संकुलने उद्यापासून बेमुदत बंद 
 

जिल्ह्यात जून ते नोव्हेंबरदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वच जलसंधारणाच्या प्रकल्पात समाधानकारक जलसाठा आहे. हतनूर, गिरणा, वाघूर ही मोठी धरणे अनेक वेळा भरली अन्‌ त्यातील पाणी सोडण्यात आले होते. लहान सिंचन प्रकल्पही भरल्याने ग्रामीण भागातील जलपातळीत वाढ झाली आहे. उन्हाळा सुरू झाला. मात्र, अजून पाणीपातळी खालावली नसल्याने तूर्ततरी पाणीटंचाईच्या झळा सुरू झालेल्या नाहीत. आगामी काळात तापमानात वाढ झाल्यास संभाव्य टंचाई कोठे जाणवेल, याचा अंदाज घेऊन जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. 

 

त्यानूसार जिल्ह्यात ३९४ गावांना पाणीटंचाईची शक्यता आहे. त्यावर ४१७ विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यात विंधन विहिरी तयार करणे, नळयोजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरती पाणीपुरवठा योजना करणे, टँकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहित करणे, विहिरींचे खोलीकरण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. 

संभाव्य पाणीटंचाई अशी 
तालुका- गावे 
अमळनेर- ८० 
भडगाव- ८ 
भुसावळ- ४ 
बोदवड- १४ 
धरणगाव- ४८ 
एरंडोल- ७ 
चाळीसगाव- ४५ 
पाचोरा- २५ 
जळगाव- १६ 
चोपडा- १४ 
रावेर- ५ 
मुक्ताईनगर- १७ 
जामनेर- १६ 
पारोळा- ७७ 
यावल- ८ 
एकूण- ३९४ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water marathi news jalgaon three hundred forty nine villages jalgaon district face water scarcity