Wedding Season : लग्नाचे बार उडणार नोव्हेंबरपासून..! | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding season

Wedding Season : लग्नाचे बार उडणार नोव्हेंबरपासून..!

जळगाव : दिवाळीनंतर तुलसीविवाह होताच विवाहेच्छू वधू-वरांची लगीनघाई सुरू होते. यंदा मात्र लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांना तब्बल महिन्याभराची वाट पाहावी लागणार आहे.

२६ नोव्हेंबरला पहिला लग्नाचा मुहूर्त आहे. यंदा २६ नोव्हेंबर ते जूनच्या २८ तारखेपर्यंत विवाहासाठी ५७ मुहूर्त आहेत. लग्नसमारंभासाठी मंगल कार्यालयांची आरक्षणे फुल झाली आहेत. स्वयंपाकी, लग्नात भोजन तयार करण्यासाठी लागणारे आचारी, बँडपथक, घोडा, बग्गी आदींचीदेखील आरक्षणे नागरिकांनी करून ठेवली आहेत. (Wedding Season Wedding starts from November Jalgaon Latest Marathi News)

सध्या मुला-मुलींची सोयरीक जुळविण्यासाठी पालक व नातेवाइकांची लगबग सुरू आहे. ज्यांचे विवाह ठरले आहेत ते अलीकडील मुहूर्त ठरवून विवाह सोहळ्याच्या तयारीत गुंतले आहेत. या वर्षीही एप्रिलला गुरूचा अस्त आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये विवाह होणार नाहीत. मेमध्ये सर्वाधिक १४, तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक कमी चार मुहूर्त आहेत.

असे आहेत विवाह मुहूर्त :

नोव्हेंबर ः २६, २७, २८, २९. डिसेंबर ः २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८. जानेवारी ः १८, २६, २७, ३१. फेब्रुवारी ः ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८. मार्च ः ८, ९, १३, १७, १८. मे ः २, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०. जून ः १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८. हे मुहूर्त वेगवेगळ्या पंचांगांनुसार लग्नमुहूर्त आहेत.

ऐनवेळी मंगल कार्यालय मिळत नसल्याने अनेक जणांनी मंगल कार्यालयासह घोडा, वाजंत्री, आचारी, मंडप याचे बुकिंग केलेले आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये ४, डिसेंबरमध्ये ८, जानेवारीमध्ये ४, फेब्रुवारीमध्ये ११, मार्चमध्ये ५, मेमध्ये १४, जूनमध्ये १२ मुहूर्त आहेत.

एप्रिल महिन्यात विवाह नाहीत

गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही एप्रिलला गुरूचा अस्त आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात विवाह होणार नाहीत. त्यामुळे एप्रिल महिना खरेदीसाठी पर्वणीचा असेल; परंतु प्रत्यक्षात लग्नमंडपाशी संबंधित व्यावसायिकांसाठी मंदीचा असणार आहे.

हेही वाचा: Nashik : घंटागाडी कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा; 2 तोळे सोन्याची पोत केली परत

काढीव लग्नमुहूर्तावर भर

विवाह मुहूर्तांखेरीज काही विवाहेच्छूंचा काढीव लग्नमुहूर्तावरही भर असतो. काही ठिकाणी यजमानांच्या आग्रहाखातर गुरुजी काढीव मुहूर्त सांगतात. त्यामुळे यंदा विवाह कार्तिकी पौर्णिमेनंतर १६ नोव्हेंबरपासून सुरू होतील.

"आमच्याकडे ११ नोव्हेंबरपासून बुकिंग झालेले आहे. विवाहासाठी सहा ते आठ महिने अगोदरच बुकिंग केले जाते. अनेक वेळा मुहूर्त नसतात, मात्र काढून दिलेल्या तारखेनुसार लग्ने होतात. जून महिन्यापर्यंतच्या लग्नाच्या तारखांना बुकिंग झालेले आहे."

-शेखर चौधरी, व्यवस्थापक, हॉटेल कमल पराडाइज

"‘अक्षता ते बिदाई व बँडबाजा ते शहनाई’ अशी आमची थीम आहे. यानुसार तुम्ही फक्त वधू-वर आणा, सर्व व्यवस्था आम्ही करतो असे पॅकेज असते. लग्नात हौसमौज केली जाते. नागरिक आपापल्या बजेटनुसार वधू-वरांचे विवाह करतात. तीन लाखांपासून कोटींपर्यंत दर आहेत. यात वधूच्या पित्याला धावपळीची गरज आम्ही ठेवत नाही."

-दिनेश थोरात, संचालक, एस. डी. इव्हेंट

हेही वाचा: Nashik: ‘फिट्स’ च्या आजारावर केला जातो विनामूल्य उपचार; औषध घेण्यासाठी रूग्णांची गर्दी