Jalgaon News : घर सोडून प्रेयसी धडकली जळगावात; ऐन लग्नघटिका समीप अन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 marriage

Jalgaon News : घर सोडून प्रेयसी धडकली जळगावात; ऐन लग्नघटिका समीप अन...

जळगाव : दिंडोली (जि. गुजरात) येथील १९ वर्षीय तरुणीने (Women) आपल्या प्रेमासाठी घर सोडून रविवारी (ता. ५) रात्री जळगाव गाठले. (women left home for marrying her boyfriend while preparing and completing legal process her parents rushed to jalgaon news)

जळगावातील प्रियकरासोबत लग्नाची संपूर्ण तयारी होऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतानाच तिचे पालक जळगावात धडकले अन् एकच धिंगाणा झाला. प्रियकर प्रेयसीला पोलिस ठाण्यात आणून बसविले, पण मुलीने जाण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता.

१९९९ मधील ‘सिर्फ तुम’ चित्रपटात अभिनेत्री आरती (प्रिया गिल)चे दीपक (संजय कपूर) याच्यावर प्रेम जळते. त्याच्याबद्दल फारसे काही जाणू न घेता आरती त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्या शोधार्थ त्याचे शहर गाठते.

अशा आशयाची प्रेमकथा जळगाव सुप्रीम कॉलनीतील तरुण पंकज आणि आरती (काल्पनिक नावे) यांचीही आहे. चित्रपटात शेवट दोघांच्या मिलापाने होतो, पण त्या दोघांच्या मिलनासाठी नियतीसह पराकोटीचे प्रयत्नांवर चित्रपटाची कथा अवलंबून आहे.

जळगावच्या पंकजचे मामा दिंडोली येथे वास्तव्यास आहेत. पंकज कामासाठी मामाकडे गेला होता. तेथेच त्याचे आरतीसोबत प्रेमसंबंध जुळले. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून प्रेमात होते आणि दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आरतीने सोडले घर..

पंकज व आरती यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्याची खात्री झाल्यावर आरतीने कोणासही काही एक न सांगता घर सोडले. काही महिन्यांपूर्वीच पंकज जळगावला परतला होता. रविवारी सकाळी आरतीने रेल्वेने जळगाव गाठले. प्रेयसी जळगावला पोहोचल्यावर प्रियकराने घाई गरबडीत लग्नाची तयारी चालविली. सोमवारी कुठल्याही मंदिरात लग्न उरकून टाकण्याचा बेत असताना, ऐनवेळेस मुलीचे कुटुंब जळगावला धडकले.

नोटरी करण्यापूर्वीच धिंगाणा

आरती आणि पंकज दोघांनी एका वकिलाच्या मदतीने कायदेशीर बाबी समजून घेतल्या. जिल्‍हा व सत्र न्यायालयासमोरच नोटरी करण्यासाठी दोघेही आले असता, नोटरीवर लिखाणाला सुरवात होण्यापूर्वीच मुलीचा भाऊ आणि आई-वडील धडकले. आरतीच्या भावाने तिला ओळखताच एकच धिंगाणा घालून नातेवाइकांनी तिला मारझोड करण्यास सुरवात केली. वेळीच शहर पोलिस पोहोचल्याने प्रकरण पोलिसांत गेले.

मला नाही जायचं वर ठाम

शहर पोलिसांनी आरती व पंकज यांना पोलिस ठाण्यात आणल्यावर दोघांची स्वतंत्र चौकशी केली. आरती वयाने सज्ञान असल्याने तिने आई-वडीलांसोबत जाण्यास नकार देत प्रियकरासोबत राहण्याचा ठाम निर्णय घेतल्याने हात उगारून धमकावणारे, भीती घालणारे कुटुंब नरमले.

मुलीच्या मिन्नत वाऱ्या करायला लागले. मात्र, मुलगी आपल्या निर्णयावर ठाम असल्याने कुटुंबीयांनी हात टेकत गुजरात पोलिसांशी संपर्क केला. गुजरात पोलिस बेपत्ता मुलीसाठी जळगावला येणार असून, रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसांत या मुलीचे कुटुंब तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते.

टॅग्स :Jalgaonwomenmarriage