
Jalgaon News : शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्ता कामाबाबत मक्तेदार बेदखल; स्मरणपत्रांना केराची टोपली
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजीनगर पुलाच्या (Bridge) दोन्ही बाजूला असलेल्या समांतर रस्त्याच्या कामाबाबत महापालिकेने मक्तेदाराला तीन स्मरणपत्रे दिल्यानंतरही त्याचे काम झाले नसल्याची तक्रार मनपा शहर अभियंत्यांनी केली आहे. (work on parallel road on both sides of Chhatrapati Shivaji Nagar bridge work was still not completed jalgaon news)
शहरातील छत्रपती शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्त्याचे काम पुलाच्या मक्तेदाराकडेच आहे. शिवाजीनगरातील पुलाच्या दोन्ही बाजूचे व टॉवरकडील पुलाच्या दोन्ही बाजूचे समांतर रस्ते मक्तेदाराने करावयाचे आहेत. मक्तेदाराने या रस्त्याचे काम केले. मात्र, त्या रस्त्यावर केवळ खडी टाकून डांबरीकरण केले आहे.
रस्त्यावर खडी आणि डांबर टाकून तब्बल तीन महिने झाले आहेत. त्यावर अद्यापही सीलकोट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता रस्त्यावरची खडी उखडत असून, वाहतुकीला अडथळा येत आहे. परिणामी, या रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. नागरिकांनी या रस्त्याचा वापरही कमी केला असल्याचे सागंण्यात येत आहे. अनेकजण दुसऱ्या मार्गाने येत आहेत.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
महापालिकेकडे तक्रार
समांतर रस्त्यावर सीलकोट करावे, यासाठी नागरिकांनी महापालिकेत तक्रारी केल्याची माहिती महापालिका शहर अभियंत्यांनी दिली. याबाबत त्यांनी सांगितले, की शिवाजीनगर पुलाच्या समांतर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. त्यांनीच मक्तेदार नियुक्त केला आहे. त्यामुळे त्याचे कामही त्यांच्याकडे आहे.
त्यामुळे आम्ही या कामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच मक्तेदारालाही पत्र दिले असून, समातंर रस्त्याचे काम त्वरित करावे, अशा आशयाची तीन पत्रे दिली आहेत. मात्र, त्यांनी अद्यापही त्याबाबत दखल घेतलेली नाही. या समांतर रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी महापालिकाही प्रयत्नशील आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एक स्मरणपत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.