मद्याच्या नशेत गेला झोल; गोलाणीत छतावरून पडून तरुण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death

मद्याच्या नशेत गेला झोल; गोलाणीत छतावरून पडून तरुण ठार

जळगाव : महापालिका प्रशासकीय इमारतीला लागून असलेल्या गोलाणी व्यापारी संकुलाच्या छतावरून पडून तरुण जागीच ठार झाला. मुकेश रमेश राजपूत असे मृत तरुणाचे नाव असून, तो खाऊ गल्लीतील चायनीज गाडीवर कामाला होता. काम संपल्यावर मित्रांसह दारूची पार्टी केल्यानंतर ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. (Young man dies after falling from roof in golani market jalgaon)

मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास दोन तरुण धावतच शहर पोलिस ठाण्यात पोचले. छतावरून त्यांचा मित्र मुकेश राजपूत पडल्याचे ते सांगत असल्याने गस्तीवरील वाहेद तडवी यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. डोक्यावर जबर दुखापत झाल्याने रक्तबंबाळ अवस्थेत जखमीला पोलिसांनी तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

गुन्हेगारीची पार्श्वभूमी

मुकेशवर यापूर्वी वाहन चोरीचे गुन्हे दाखल असून, तो पोलिस दरबारी हिश्ट्रीशीटर आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून सर्व धंदे सोडून तो चायनीज गाडीवर कामाला लागला होता. त्याच्या मागे दोन भाऊ व आई असा परिवार आहे.

हेही वाचा: जळगाव : जिल्हा रुग्णालयातील मारहाण प्रकरणी चार पोलिस निलंबित

नेमके काय घडले

मुकेश राजपूतचे मित्र अमर बारूट आणि बबलू या दोघांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मुकेश कुटुंबियांसह कंजरवाडा-नाथवाड्यात वास्तव्यास आहे. सोमवारी (ता. ९) रात्री काम आटोपल्यावर तो घरी जातो, असे सांगून निघून गेला. मात्र, घरी न जाता तो रात्री त्याच्या दोन मित्रांसह त्याने पार्टीचा बेत आखून जवळच गोलाणी मार्केटच्या छतावर तिघेही मित्र दारूच्या पार्टीसाठी बसले.

तृतीयपंथीयाची आठवण अन्‌

यथेच्छ दारू ढोसल्यावर त्याच्यासोबतच्या दोन्ही मित्रांसह तो खाली उतरत असताना, अचानक त्याला त्याच्या ओळखीच्या तृतीयपंथीयाची आठवण झाल्याने त्यांच्या शोधासाठी मुकेश परत माघारी फिरला. दोघेही खाली उतरल्यावर थोड्याच वेळात मुकेश छतावरून थेट जमिनीवर पडल्याने दोघा मित्रांनी तेथून पळ काढत थेट पोलिस ठाणे गाठत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

शवविच्छेदनात आढळले मद्य

पोलिस गस्ती पथकाने मृतदेह उचलून जिल्‍हा सामान्य रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. मंगळवारी सकाळी त्याच्यावर डॉ. देवरे यांच्या पथकाने शवविच्छेदन केले. प्राथमिक अहवालानुसार त्याच्या जठरात मद्य आढळून आले आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना देण्यात आला. नंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हेही वाचा: भाजपच्या महाजनांनी घेतली शिवसेना आमदाराची भेट, घडामोडींना वेग


गोलाणीत उपद्रव कायम

गोलाणी व्यापारी संकुलात दिवसभर वाहन चोरट्यांचा वावर असतो. दुकाने बंद झाल्यावर पेट्रोल चोरटे उच्छाद मांडतात. त्यासोबतच गैरकृत्य करणारे जोडपे अंधाराचा फायदा घेत रममाण होतात. मार्केटमध्ये भुरट्या चोरांचाही प्रचंड त्रास आहे. त्यासोबतच तृतीयपंथीय तरुणांसह टोळक्यांच्या हाणामाऱ्या, वाद आणि गैरकृत्य नित्याचे झाले आहे. हटकणाऱ्यांना ही मंडळी धमकावतात. वेळप्रसंगी अंगावर धावून जातात.

घातपाताची शक्यता

मुकेश छतावरून कोसळण्यापूर्वी त्याचे दोन मित्र बबलू व अमर सोबत होते. याच दोघांनी त्याला काही गुन्ह्यातही अडकविले होते. १५ ते २० दिवसांपूर्वी तो जामीन सुटला होता. पैशांचा वाद किंवा हिश्यावरून मुकेशसोबत वाद होऊन ही घटना घडल्याचा संशय आहे. आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचे मृत मुकेशचा भाऊ संदीपने ‘सकाळ’शी बेालताना सांगितले.

Web Title: Young Man Dies After Falling From Roof In Golani Market Jalgaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaondeath
go to top