esakal | पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात मेगा भरती
sakal

बोलून बातमी शोधा

Pune-ZP

पुणे झेडपीच्या आरोग्य विभागात मेगा भरती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ‘क’ गटातील सर्व रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरातच ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या भरतीत क गटातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधनिर्माता आणि आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश केला आहे.

राज्य सरकारने या भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली भरती समिती स्थापन केली आहे. या समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आदींची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार हे या समितीचे सदस्य-सचिव असणार आहेत.

हेही वाचा: 'Frozen Eyes'वर यशस्वी शस्त्रक्रिया, 30 वर्षांनी जुनैदला दृष्टी

ही पदे भरण्यासाठी याआधी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. परंतु त्याचवेळी पहिल्यांदा लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर या भरतीसाठीचे महापोर्टल रद्द झाले. या सर्व घटनांमुळे ही भरती तेव्हा पूर्ण होऊ शकली नाही. सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. यामुळे ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी ही रिक्त पदे तत्काळ भरण्यास अर्थ विभागाने परवानगी दिली आहे.

दरम्यान, या भरतीसाठी मार्च २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: आठवड्यात श्वानाचे 5 किलो वजन कमी;देशात पहिलीच शस्त्रक्रिया

''लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन वर्षांपासून ही भरती रखडली होती. त्यातच कोरोना संसर्ग सुरू झाला. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही भरती पुन्हा सुरु करण्याची मागणी केली होती. त्याला यश आले आहे. येत्या महिनाभरात ही पद भरती करण्याचे नियोजन आहे.''

- प्रमोद काकडे, आरोग्य सभापती, जिल्हा परिषद, पुणे

भरतीसाठीचा कालबद्ध कार्यक्रम

- आरक्षणनिहाय रिक्त पदे निश्‍चित करणे ः १५ ते २८ जून

- जाहिरात प्रसिद्ध करणे ः २९ जून

- दिव्यांगांच्या नव्याने समावेशासाठी जाहिरात ः ३० जून

- नव्याने समाविष्ट दिव्यांगांकडून अर्ज मागविणे ः १ ते २१ जुलै

- लेखी परीक्षेचे नियोजन ः २२ जुलै ते ३१ जुलै

- प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास उपलब्ध करून देणे ः १ ते ५ ऑगस्ट

- लेखी परीक्षा ः ७ व ८ ऑगस्ट

- परीक्षेचा निकाल व प्रत्यक्ष नियुक्ती ः ९ ते २३ ऑगस्ट

loading image
go to top