AI at workplace
AI at workplace Esakal

Microsoft linkedin Work Trend: भारतातील किती टक्के कर्मचारी कामाच्या ठिकाणी AI चा वापर करतात?

मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनच्या २०२४ सालच्या 'वर्क ट्रेंड इंडेक्स' मधून आकडेवारी समोर

मुंबई: भारतातील ९२ टक्के व्यक्ती या कामाच्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करतात. ही आकडेवारी कोणालाही धक्कादायक वाटू शकते परंतु मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइनसारख्या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. परंतु यांनी यासाठी सरसकट कर्मचारी सर्व्हेक्षण न घेता भारतातील 'नॉलेज वर्कर्स' म्हणजेच ज्ञाननिर्मितीचे काम करणारी वरच्या फळीतील मंडळी घेतली आहेत. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारताची आकडेवारी उजवी ठरली आहे.

मायक्रोसॉफ्ट आणि लिंक्डइन यांनी पहिल्यांदाच एकत्र येत २०२४ सालचा चौथा 'वर्क ट्रेंड इंडेक्स' सादर केला आहे. यामध्ये त्यांनी ३१ देशांमधील ३१००० व्यक्तींचे सर्व्हेक्षण केले आहे. लिंक्डइनवरील नोकरी देणाऱ्या कंपन्यांचा ट्रेंड, मायक्रोसॉफ्ट उत्पादकता संकेत आणि ५०० व्यक्तींवर केले गेलेले संशोधन या गोष्टींच्या आधारे हा अहवाल मांडला आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने १६ मे २०२४ रोजी या संदर्भातील ब्लॉग देखील प्रसिद्ध केला आहे.

केवळ एका वर्षात एआय लोकांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि नोकरीवर नियुक्ती करण्याच्या पद्धतीत कसा प्रभाव पाडत आहे हे या अहवालातून समोर आले आहे.

अहवालातील काही ठळक वैशिष्टये

१) जगातील ३१ देशांच्या सर्व्हेक्षणाच्या आकडेवारीत एकूण ७५ टक्के 'नॉलेज वर्कर्स' हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कामाच्या ठिकाणी वापर करतात; तर भारतातील लोकांची संख्या ही ९२ टक्के आहे.

२) भारतातील महत्वाच्या पदांवर काम करणाऱ्या ९१ टक्के व्यक्तींना वाटते की, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कामात एआयचा वापर महत्वाचा आहे. पण ५४ टक्के कर्मचारी त्यांची कंपनी एआय चा वापर करेल की नाही या बाबत चिंता व्यक्त करत आहेत.

३) भारतातील ७५ टक्के महत्वाच्या पदांवरील व्यक्ती (लीडर्स) चे म्हणणे आहे की, एआय कौशल्य नसणाऱ्या व्यक्तींना आम्ही नियुक्त करायला इच्छुक नसू.

४) अनुभवी आणि एआय कौशल्य असणाऱ्यांना आम्ही नोकरीवर घेण्यासाठी प्राधान्य देऊ असे ८० टक्के लीडर्स म्हणत आहेत. कमी अनुभव असेल तरीही चालेल मात्र एआय कौशल्य असणाऱ्यांना आम्ही जास्त प्राधान्य देऊ असेही या अहवालात लीडर्स सांगत आहेत.

५) मागील वर्षाच्या अखेरीस लिंक्डइन सदस्यांमध्ये १४२ पटींनी वाढ झाली आहे ज्यांच्या प्रोफाइलमध्ये Copilot आणि ChatGPT सारखी एआय कौशल्याचा समावेश केला आहे.

“एआय कामाची पद्धती बदलत आहे. व्यक्ती आणि संस्था या दोघांनाही बदल स्वीकारण्यास उद्युक्त करत आहे. लिंक्डइन व्यासपीठ आणि वर्क ट्रेंड इंडेक्सच्या निष्कर्ष पाहता एआय कौशल्य येणाऱ्या व्यक्तींच्या मागणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के झाली आहे. तंत्रज्ञान आणि प्रतिभा या दोन्हीमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करून संस्थांमध्ये एआय क्षमतांना चालना देणे महत्त्वाचे आहे.”
- रुची आनंद, टॅलेंट अँड लर्निंग सोल्युशन्स प्रमुख, लिंक्डइन

६) या अहवालासाठी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, एआय चा वापर करणारी मंडळी ही देखील चार प्रकारात आढळतात. क्वचितच एआय वापरून पाहणारे, काहीतरी शोधायचे आहे म्हणून एआयचा वापर करणारे, नवशिके आणि नियमितपणे एआय चा वापर करणारे.

७) कामाच्या ठिकाणी 'जनरेटिव्ह एआय' चा वापर जागतिक स्तरावर गेल्या सहा महिन्यांत जवळपास दुप्पट झाला असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

८) या अहवालाच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने 'Microsoft 365' च्या अनुषंगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात कोणत्या क्षमतांचा विकास व्हायला हवा आहे याबाबतच्या घोषणा केल्या आहेत. आणि त्याच धर्तीवर 'लिंक्डइन' ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयातील ५० मोफत अभ्यासक्रमांची घोषणा केली आहे.

९) ८ जुलै २०२४ पर्यंत मोफत देणाऱ्या या ५० अभ्यासक्रमासह एआय पॉवर कोचिंगही देण्यात येणार आहे.

१०) हा अहवाल सादर करताना अत्यंत निवडक आणि कमी व्यक्तींना निवडले (sample size ) आहे, त्यामुळेच हा अहवाल एकूणच भारतातील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. मात्र या अहवालाच्या निमित्ताने एआय विषयक ५० अभ्यासक्रम मोफत उपलब्ध झाले आहे ही एआय वापरकर्त्यांसाठी आनंदाची बाब आहे.

------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com