esakal | कोतवडे येथे गांडूळ खतातून समृद्ध शेती व समृद्धीही
sakal

बोलून बातमी शोधा

कोतवडे येथे गांडूळ खतातून समृद्ध शेती व समृद्धीही

रत्नागिरी - तालुक्‍यातील कोतवडे येथील झेप ग्रामविकास महिला मंचाने गांडूळ खताचा ब्रॅंड विकसित केला आहे. मंचातर्फे तीन महिन्यांपूर्वी अनुलोम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली १० ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यात आले. शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रकल्प सुरू केला तरी खत विक्रीतून उत्पन्नही मिळवण्यात येणार आहे. गावपातळीवर प्रथमच हा प्रयोग यशस्वी होत आहे. हळूहळू कोतवड्याला ‘गांडूळ खताचे गाव’ अशी नवी ओळख मिळणार आहे.

कोतवडे येथे गांडूळ खतातून समृद्ध शेती व समृद्धीही

sakal_logo
By
मकरंद पटवर्धन

रत्नागिरी - तालुक्‍यातील कोतवडे येथील झेप ग्रामविकास महिला मंचाने गांडूळ खताचा ब्रॅंड विकसित केला आहे. मंचातर्फे तीन महिन्यांपूर्वी अनुलोम संस्थेच्या मार्गदर्शनाखाली १० ठिकाणी गांडूळ खत प्रकल्प सुरू करण्यात आले. शेती उत्पादन वाढवण्यासाठी प्रकल्प सुरू केला तरी खत विक्रीतून उत्पन्नही मिळवण्यात येणार आहे. गावपातळीवर प्रथमच हा प्रयोग यशस्वी होत आहे. हळूहळू कोतवड्याला ‘गांडूळ खताचे गाव’ अशी नवी ओळख मिळणार आहे.

झेप संस्थेच्या सौ. समृद्धी सोनार यांनी सांगितले की, अनुलोम व झेपच्या संयुक्त विद्यमाने आम्ही दहा हजार रुपये खर्च करून गांडूळ खतासाठी दोन गादीवाफे तयार केले. नारळाच्या सोडणांचा थर व पालापाचोळा, शेण, कचरा यांचे थर केले. त्यात तीनशे गांडूळ सोडले, दररोज पाणी दिले. झिरपणारे पाणी साठवले आहे. तेसुद्धा झाडांसाठी पोषक आहे. पहिल्या वाफ्यातून प्रथमच खत काढून ते पॅकिंग केले आहे. कोतवड्यात दहा ठिकाणी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने वाफे तयार केले आहेत. अजून दहा ठिकाणी वाफे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक वाडीने पुढाकार घेतला आहे.

खर्चाची बचत
कोतवडे-घारपुरेवाडी येथील कृष्णा शितप व सौ. मनीषा शितप या दांपत्याने सांगितले की, नारळ, आंबा, काजू व भातशेतीसाठी प्रतिवर्षी आठ हजार रुपयांचे सेंद्रिय खत विकत घ्यावे लागते. 
अनुलोममुळे आम्हीसुद्धा गांडूळ खताचे दोन वाफे केले. पुढील महिन्यात खत तयार होणार आहे. वर्षभरात चार वेळा खतनिर्मिती करणार आहे. एका वाफ्यातून आमची गरज भागेल व उर्वरित खताची विक्री करून उत्पन्नही मिळणार आहे.

गांडूळ खत लाभदायी
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी गांडूळ खत लाभदायी आहे. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात, ह्यूमसचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश झाडांना भरपूर उपलब्ध होतात. कोतवडे गावात हिवाळी-उन्हाळी भाजीपाला, आंबा, काजूचे उत्पन्न घेतले जाते. पहिल्यांदा केलेले खत शेतीसाठी वापरल्यास नंतरचे खत विक्री करून भांडवली गुंतवणूक सोडवणे शक्‍य आहे.

‘अनुलोम’ची दिशा
अनुलोम संस्थेने रत्नागिरीतील गावामध्ये संपर्क साधून ग्रामस्थांना एकत्र आणले आहे. शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्याकरिता वेगवेगळे उपक्रम राबवतो, असे संस्थेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपविभागप्रमुख स्वप्नील सावंत व अनुलोमचे भाग जनसेवक रवींद्र भोवड यांनी 
सांगितले.

वर्षाला ४० हजारांवर उत्पन्न
८ फूट लांब, २.५ फूट रुंद व २.५ फूट उंच या मापाचे दोन वाफे तयार करण्यासाठी ६००० हजार खर्च येतो. शेण, पाळापाचोळा, कुजणारे सर्व पदार्थ यासाठी येणारा खर्च अंदाजे १२५० रुपये आहे. एकूण खर्च ७२५० अपेक्षित आहे. दर तीन महिन्यांनी दोन वाफ्यांतून ५०० किलो खत तयार होते. २० रुपये प्रति किलो दराने खत विक्री केल्यास १० हजार रुपये मिळतात. अशाप्रकारे वर्षातून चारवेळा खतनिर्मिती केल्यास सुमारे २ टन खत तयार होईल. यातून ४०-४५ हजार रुपये उत्पन्न मिळू शकेल.

loading image