esakal | #MondayMotivation : नारायणगावात ४०० गणेशमूर्तींचे दान
sakal

बोलून बातमी शोधा

Four hundred Ganesh idols donated  Narayangan

मीना नदी स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत नारायणगाव, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व नारायणगाव पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा हा उपक्रम सुरू केला आहे.

#MondayMotivation : नारायणगावात ४०० गणेशमूर्तींचे दान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव - मीना नदी स्वच्छता अभियान, ग्रामपंचायत नारायणगाव, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान व नारायणगाव पोलिस ठाणे यांच्या वतीने प्रदूषणविरहित विसर्जनाचा श्रीगणेशा हा उपक्रम सुरू केला आहे. विसर्जनासाठी आलेल्या गणेशमूर्ती स्वीकारण्यासाठी येथील मीना नदीतीरावर स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे. मागील सात दिवसांत सुमारे चारशे गणेशमूर्ती केंद्रात दान करण्यात आल्या आहेत. जलप्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती दान करा, निर्माल्य केंद्रात जमा करा, असे आवाहन मीना नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक जितेंद्र गुंजाळ, दीपक वारुळे यांनी केले आहे.

नारायणगाव, वारूळवाडी परिसरातील सुमारे तीन हजार घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मीना नदीपात्रात केले जाते. गणेशमूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे पाण्यात विरघळत नाहीत. मूर्तींना देण्यात आलेले रासायनिक रंग व प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे जलप्रदूषण होते. विसर्जनानंतर सजावटीसाठी वापरलेले थर्माकोल, प्लॅस्टिकचे साहित्य, निर्माल्य, गुलाल, फळे, फुले, केळीचे खुंट नदीपात्रात टाकण्याची परंपरा आहे, यामुळे मीना नदी प्रदूषित होते. ग्रामपंचायतीच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी मीनाई स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. मीना नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी सरपंच योगेश पाट, नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील, मीना नदी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक गुंजाळ, वारुळे यांच्या पुढाकारातून येथील आठवडे बाजार येथे विसर्जन मार्गावर मीना नदीकाठी गणेशमूर्ती स्वीकृती केंद्र सुरू करण्यात आले आहे.

याबाबत गुंजाळ म्हणाले, ‘‘गुरुवारी (ता. १२) गणेशोत्सवाची सांगता होत आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विसर्जनासाठी येणार आहेत. गणेश भक्तांनी गणेशमूर्ती मीना नदीपात्रात विसर्जन न करता केंद्रात जमा कराव्यात.’’

विसर्जनासाठी आलेल्या सुमारे चारशे घरगुती गणेशमूर्ती सात दिवसांत स्वीकृती केंद्रात जमा झाल्या आहेत. यापैकी बहुसंख्य मूर्ती दीड ते दोन फूट उंचीच्या आहेत. प्रदूषण टाळण्यासाठी लहान आकाराच्या अगदी पाच ते सहा इंच उंचीच्या घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करावी. शाडूच्या गणेशमूर्तीचा वापर करावा.
- दीपक वारुळे, प्रवर्तक,  मीना नदी स्वच्छता अभियान