दिव्यांग विद्यार्थ्याने बनवली ‘शिवशाही’

मकरंद पटवर्धन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - येथील दिव्यांग विद्यार्थ्याने एसटी महामंडळाच्या आलिशान शिवशाही बसची देखणी व हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. शिवशाहीचा आकार, रंग खूपच सुरेख साधला असून बॅटरी जोडल्यामुळे गाडी पुढे जाते व मागेसुद्धा येते. एलईडी दिवेही प्रज्वलित होतात. पुठ्ठ्यापासून गाडी बनवणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव आहे साहिल महेंद्र खानविलकर.

येथील के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात साहिल आठवीत शिकतो आहे. मोबाईलवर त्याने शिवशाही गाडीचे चित्र पाहिले. नंतर त्याला आपणही अशी गाडी बनवली पाहिजे असे ठरवले. सुमारे आठवडाभर त्याने कष्ट घेऊन शिवशाहीची प्रतिकृती बनवली. खोका, पुठ्ठा, एलईडी लाईट्‌स, रेडियम आदींचा वापर करून गाडी बनवली. गाडीचे एकूण आकारमान बहुतांशी योग्य बनवण्यात साहिल यशस्वी झाला आहे. यापूर्वी त्याने रिक्षा, मोटार गाड्यांच्याही प्रतिकृती बनवल्या होत्या.

साहिल लहानपणापासूनच शाळेतून घरी आल्यावर स्वतः कारागिरी करत बसतो. तो कर्लेकरवाडी येथे राहतो. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. घरचा गणपतीही तो स्वतः साकारतो. यापूर्वी त्याने आर्ट सर्कल व आसमंत फाउंडेशन आयोजित मूर्तीकला स्पर्धेत बक्षीस मिळवले आहे. विद्यालयातील अन्य विद्यार्थ्यांसोबत बनवलेल्या ‘व्हायब्रेटर’ उपकरणाला बालविज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक मिळवला आहे. 

जेट टॉय स्पर्धेतही साहिलने भाग घेतला होता. साहिल हरहुन्नरी असल्याने कलात्मक व तांत्रिक उपकरणे बनवण्यात तो नेहमी पुढे असतो. पालक आणि शिक्षकांचे नेहमी मिळणारे प्रोत्साहन यामुळे त्याचा आत्मविश्‍वासही वाढला आहे. याबद्दल मुख्याध्यापिका अनुराधा ताटके यांनी अभिनंदन केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News handicap student creat ShivShahi Bus model