‘देवदूता’च्या मदतीने कुष्ठरुग्णाला मिळाली नवी उमेद

‘देवदूता’च्या मदतीने कुष्ठरुग्णाला मिळाली नवी उमेद

रत्नागिरी -  दोन्ही पायांच्या भळभळणाऱ्या जखमांमध्ये पडलेले किडे, त्यामुळे पसरणारी दुर्गंधी, असाहाय्य वेदनांमुळे विव्हळणारा तो अक्षरशः हात जोडून देवाकडे मरण मागत होता. एवढ्यात तेथे अवतरला जिजेश बालन. हा केरळचा मात्र सावर्डेत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला देवदूत. त्याने या दुर्लक्षित कुष्ठरुग्णाला गोंजारले. तत्काळ प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात आणले. रुग्णालयात त्याच्यावर चांगले उपचार झाल्याने या कुष्ठरोग्याच्या मनात आज जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे.

शांताराम दत्ताराम मेस्त्री (वय ५०, रा. सुतारवाडी, वेहेळे) असे त्याचे नाव आहे. ‘सकाळ’ने या कुष्ठरुग्णाच्या हलाखीच्या परिस्थितीबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खरोखर रस्त्यावर आलेल्या कुष्ठरुग्णांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत कुष्ठरुग्ण आढळतात. 
या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेकडून कुष्ठरुग्णांची तपासणी होते का, असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. शांताराम मेस्त्री यांच्या हाताची बोटं झडून गेली, पायाला लागण झाल्याने त्या जखमा भळभळू लागल्या.

तो अक्षरशः मरणयातना भोगत होता. तेव्हा सावर्डेतील जिजेश बालन (अण्णा टायरवाला) हे सामाजिक कायकर्ते आणि शांताराम मेस्त्रीसाठी देवदूतच बनून आले. याकामी महिला पोलिस कर्मचारी सौ. वनिता गमरे, ‘सकाळ’चे बातमीदार नागेश पाटील, मयूरेश पाटणकर यांनी मदत केली. जिल्हा रुग्णालयात शांताराम मेस्त्रीला जिजेश बालन यांनी दाखल केले. रुग्णालयात त्याच्यावर चांगले उपचार झाले. वेदना कमी झाल्याने आज त्याची प्रकृती स्थिर आहे. 

देवदूताच्या मदतीने शांताराम मेस्त्रीच्या मनात जगण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयातील टीबी वॉर्डमध्ये तो उपचार घेत आहे. त्यामुळे कुष्ठरुग्णांसाठी आरोग्य यंत्रणेने स्वतंत्र कक्ष उघडण्याची गरज आहे. 

अनेक कुष्ठरुग्ण, वेडसरांना मी आश्रय दिला आहे. त्यांचे दाढी-केस कापून स्वच्छ आंघोळ घालून कपडे देऊ केले आहेत. मला हे काम करण्यात एक वेगळे समाधान मिळते. गरजूंना मदत करण्यासाठी मला जुने कपडे आणि काहीसा आर्थिक भार उचलला तर अनेक निराधारांना आधार देण्याचे भाग्य माझ्या नशिबी येईल.
- जिजेश बालन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com