रत्नागिरीत सामुदायिक विवाहातून एकतेचा संदेश

रत्नागिरीत सामुदायिक विवाहातून एकतेचा संदेश

रत्नागिरी - हिंदू, बौद्ध आणि मुस्लिम धर्मातील १० वधू-वरांचे विवाह एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळाले. निमित्त होते सामुदायिक विवाह सोहळा समितीने आयोजित केलेल्या सामुदायिक विवाहांचे. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे विवाह झाले.

राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या संकल्पनेतून धर्मादाय आयुक्त कार्यालयाने या सोहळ्याचे पटवर्धन हायस्कूलमध्ये आयोजन केले होते. धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार, सहाय्यक धर्मादाय आयुक्त 
ए. पी. कुलकर्णी, अधीक्षक शिवराज नाईकवाडे यांच्यासमवेत प्रत्येक धर्म, जाती व सामाजिक कार्य करणाऱ्यांची विवाह समिती नेमण्यात आली.

सोनाली भातडे-मयूर सनगरे, शुक्रिया कांबळे-पराग साळुंखे, श्रद्धा दळवी-वैभव कदम, पूजा मोहिते-रवींद्र शिगवण,  कल्पना पवार-रूपेश सावंत, शालिनी सावंत-प्रदीप कांबळे, प्रियांका सुर्वे-सूरज कदम, तैमिना अलजी-एजाज गोलंदाज आणि फक्त नोंदणीद्वारे मयूरी मांडवकर-विद्यानंद कोत्रे, सुप्रिया गुडेकर-अनमोल कोत्रे यांचे विवाह झाले. 

वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार उदय सामंत, आमदार हुस्नबानू खलिफे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत, नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली. दानशुरांकडून मिळालेल्या देणगीतून वधू-वरांना हंडाकळशी, पोशाख, साडी तसेच तीन ग्रॅमचे मंगळसूत्र आणि श्‍यामची आई, हितगुज सखीशी ही पुस्तके देण्यात आली.

समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतल्याने सोहळा उत्साहात झाला. येत्या २१ जूनला पुढचा मुहूर्त आहे. त्यावेळी गणपतीपुळे, पावस आणि परशुराम येथे सामुदायिक विवाहांचे आयोजन केले आहे.
- हिराभाई बुटाला,
अध्यक्ष, सामुदायिक विवाह सोहळा समिती

सामुदायिक विवाह सोहळ्याने झाली लाखोंची बचत

लग्नातील बडेजाव, वारेमाप खर्च आणि पैशांची उधळपट्टी रोखणारा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केल्याने आज लाखो रुपयांची बचत झाली. एकाच व्यासपीठावर सर्व धर्मांतील विवाह सोहळे झाले. देवस्थाने, शिक्षण संस्था व सामाजिक संस्थांच्या मदतीने विवाह सोहळा यशस्वी झाला.
पटवर्धन हायस्कूलमध्ये झालेल्या या सोहळ्यात वधू-वरांचे सुमारे पाचशे नातेवाईक उपस्थित होते.

श्री क्षेत्र गणपतीपुळे, श्री जगद्‌गुरू नरेंद्राचार्य संस्थान, परशुराम देवस्थान, सह्याद्री शिक्षण संस्था, भारत शिक्षण मंडळ, व्याडेश्‍वर देवस्थान फंड, पद्मावती सोशल फाऊंडेशन, क्रेडाई, आस्था सोशल फाऊंडेशन, भैरी भवानी देवस्थान, वालावलकर ट्रस्ट, काळकाई देवस्थान, दुर्गादेवी देवस्थान, ओंकार ओतारी चॅरिटेबल ट्रस्ट,  सुयश कॉम्प्युटर्स, एच. पी. बुटाला अँड सर्व्हिसेस यांनी या सोहळ्यात वधू-वरांना आवश्‍यक वस्तू दिल्या.

विवाह सोहळ्यात वेळ, पैसा व बरेच श्रम खर्ची पडतात. त्यामुळे मी सुरवातीपासूनच फक्त नोंदणीद्वारे विवाह करण्याचे  ठरवले. सासरच्या मंडळींनीही याला लगेच होकार दिला. मी बीए झालो असून लांजा एसटी डेपोत लिपीक आहे. पत्नी एमए झाली आहे. 
- विद्यानंद कोत्रे व मयूरी मांडवकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com