‘लालपरी’चा भुरळ पाडणारा साज

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मालवण - प्रवाशांच्या सेवेसाठी हिरकणी आली, यशवंती आली आणि आता आता तर ’शिवशाही’ बसही दाखल झाली; मात्र आगाराचे कर्तव्यनिष्ठ चालक संतोष पाटील यांच्या ताफ्यातील ’लालपरी’ काही औरच आहे.

मालवण - प्रवाशांच्या सेवेसाठी हिरकणी आली, यशवंती आली आणि आता आता तर ’शिवशाही’ बसही दाखल झाली; मात्र आगाराचे कर्तव्यनिष्ठ चालक संतोष पाटील यांच्या ताफ्यातील ’लालपरी’ काही औरच आहे. आंगणेवाडी यात्रोत्सवात गेली पाच वर्षे श्री. पाटील हे चालक भाविक प्रवाशांना दर्जेदार सेवा देताना दरवर्षी एसटीला अनोख्या पद्धतीने सजवतात. वेगवेगळ्या छायाचित्रातून सामाजिक संदेश देणाऱ्या या अवलियाने संत गाडगे महाराजांचा स्वच्छतेचा वसा देणारा संदेश यावर्षी दिला. 

येथील एसटी आगारात श्री. पाटील हे गेली अनेक वर्षे सेवा बजावत आहे. एसटी आपला संसार असून प्रवासी आपले कुटुंबातील सदस्य आहेत, या भावनेतून त्यांनी हजारो प्रवाशांच्या हृदयावर राज्य गाजवले. शैक्षणिक सहल, प्रासंगिक करार तसेच एसटीच्या जादा फेऱ्या असल्या की प्रवाशांना पाटील यांच्या ताफ्यातील एसटीने प्रवास करणे अधिक सुखकर वाटते. एसटी म्हटली की लाल डबा म्हणून नाक मुरडणारे सर्वसाधारण प्रवासी चालक पाटील यांना पाहिल्यावर मात्र त्यांच्या ’लालपरी’त बसण्यासाठी आतुर होतात. 

एसटी महामंडळाकडून दरवर्षी प्रवाशांच्या सेवेसाठी आणि खासगी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी आधुनिक प्रकारच्या गाड्या लॉन्च करत आहेत. हिरकणी, यशवंती, परिवर्तन आणि अलीकडेच सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल अशी वातानुकूलित शिवशाही बस प्रवाशांच्या पसंतीस उतरत आहेत. असे असताना नाका मुरडणाऱ्या लालडब्याला झळाळी देण्यासाठी श्री. पाटील कित्येक वर्षे झगडत आहेत.

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी खास विद्युत रोषणाई, गाण्यांची व्यवस्था, एसटीच्या आतमध्ये वातानुकूलित सेवा नसली तरी बैठक व्यवस्था अफलातून करतात. प्रवाशांना मोबाईल चार्जिंग करण्याची व्यवस्था असते. त्यामुळे आंगणेवाडी यात्रोत्सवाला एसटी प्रवास करणारे भाविक पाटील हे ज्या बसवर चालक असतील, त्याच बसने प्रवास करण्याचा हट्ट धरतात. पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन येथील आगारातील अन्य चालकही आपापल्या परीने आणि स्वखर्चाने एसटी बस सजवतात. 

उपक्रमाचे कौतुक...
गतवर्षी एसटीच्या जीवन प्रवासातील छायाचित्रे लावून एसटीला गतवैभव देण्यासाठी हातभार लावला होता. यावर्षी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी दिलेल्या स्वच्छतेचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी एसटीच्या सभोवताली स्वच्छता जनजागृतीची छायाचित्रे लावून स्वच्छतेचा संदेश दिला. पाटील हे पुढाकार घेऊन राबवत असलेल्या उपक्रमांचे आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी कौतुक केले आहे. चालक पाटील यांनी आगारातील सर्व अधिकारी, चालक, वाहक तसेच कार्यशाळेतील कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News ST decoration by Driver special story