वृद्धेचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभारण्यासाठी तरुणांची मदत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

माणसात अजूनही माणुसकी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मदत. ज्यांना खरच आधार नाहीय अशा निराधारांना यापुढेही आधार देऊ

- गणेश पावले

तळेरे - नाधवडे येथील वृद्ध महिलेचा उघड्यावर पडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी तरुणांनी मदत केली. ७ नोव्हेंबर २०१७ ची रात्र सुवर्णा सुरेश पावसकर यांच्यासाठी काळरात्र ठरली. शॉटसर्किटने अचानक घराने पेट घेतला आणि डोळ्यादेखत सारा संसार जळून खाक झाला. भांडीकुंडी, कपडे, धान्य आगीचे भक्ष्य झाले. घराचे छप्पर जळून पडले. पाहणाऱ्यांचे हृदय पाणावले. संपूर्ण वैभववाडी तालुक्‍यात या घटनेनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

पतीचे छत्र हरवलेले असताना जळालेला संसार पुन्हा उभा करायचा पण या वृद्ध महिलेला कुणाचाच आधार नाही. शेजारी पाजाऱ्यांनी तिला आधार दिला. ती घरात एकटीच मदतीला कोणीच नाही. हे पाहून काही तरुणांनी आधार देण्याचे ठरवले. मुबंईस्थित गणेश पावले, प्रदीप ढवण, गणेश मोरे, प्रकाश मोरे, गणपत खांडेकर, दिलीप सावंत, प्रशांत सावंत, जगदीश चाळके, निनाद शिंदे, गणेश घागरे आणि पत्रकार पंकज मोरे यांनी सुवर्णा सुरेश पावसकर यांना मदत सुपूर्द केली.

सोशल मीडिया परिवार वैभववाडी यांच्याकडून मदत म्हणून रोख रक्कम आणि घरात लागणारी भांडी, स्टोव्ह, टोप, स्टीलचे डब्बे, ताट, चमचे, पालिते, ग्लास, हंडा - कळशी, स्टीलची पाण्याची टाकी, किटली, डिश, लाटणी, पोळपाट चटई, चादर इ. वस्तू भेट दिल्या.

माणसात अजूनही माणुसकी आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मदत. ज्यांना खरच आधार नाहीय अशा निराधारांना यापुढेही आधार देऊ

- गणेश पावले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg News youth group helps to old lady