खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

लातूर - अनेक वर्षे शारीरिक कष्टाची कामे केली. प्रशासनात अधिकारी झाल्यापासून खुर्चीत एका ठिकाणी बसूनच कामकाज सुरू झाले. तेच श्रम आणि त्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली; मात्र खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा असल्याचा प्रत्यय आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संजय तुबाकले यांनी हा अनुभव शेअर करीत श्रमदानाचे समाधान मिळाल्याचे सांगितले. 

लातूर - अनेक वर्षे शारीरिक कष्टाची कामे केली. प्रशासनात अधिकारी झाल्यापासून खुर्चीत एका ठिकाणी बसूनच कामकाज सुरू झाले. तेच श्रम आणि त्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली; मात्र खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा असल्याचा प्रत्यय आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संजय तुबाकले यांनी हा अनुभव शेअर करीत श्रमदानाचे समाधान मिळाल्याचे सांगितले. 

अभिनेता अमीर खान यांनी स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशनच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या वॉटर कपच्या माध्यमातून गावागावांत सध्या श्रमदानाची स्पर्धा सुरू आहे. यासाठी ग्रामस्थ, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व अनेक घटक एकत्र आले आहेत. शिवारात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवून तो जिरविण्यासाठी सर्वजण सरसावले आहेत. पहाटेपासूनच श्रमदान करण्यासाठी लोक हजेरी लावत आहेत. औसा तालुक्‍यातील अनेक गावांनी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. यातील नागरसोगा येथे शनिवारी (ता. 22) सकाळी सहा ते अकरापर्यंत तब्बल पाच तास श्री. पोले व श्री. विधाते यांनी श्रमदान केले. शेततळे खोदण्यासह शेतीच्या बांधबंदिस्तीचे काम त्यांनी केले. जिल्हाधिकारी श्रमदान करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ व कर्मचाऱ्यांनी सहभाग देत त्यांच्याबरोबरीने श्रमदान केले. श्री. पोले यांचा आदर्श घेऊन डॉ. तुबाकले यांनीही चिलंवतवाडी (ता. निलंगा) येथे रविवारी (ता. 23) सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत काम केले. त्यांच्यासोबत ग्रामसेवक संघटना व ग्रामस्थांसह साडेतीनशे जणांनी योगदान दिले. पाच तासांत सर्वांनी मिळून तब्बल अडीच एकरमधील कंपार्टमेंट बंडिंगचे काम तडीस नेले. या वेळी सरपंच वर्षा मरे, उपसरपंच दत्तात्रय मरे, बाबुरेड्डी मरे, सहायक गटविकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, विस्तार अधिकारी (पंचायत) अंकुश बिराजदार, ग्रामसेवक संघटनेचे तानाजी बिराजदार उपस्थित होते. 

अतुल कुलकर्णींचे ग्रामसभेत मार्गदर्शन 
भारतीय जैन संघटनेनेही औसा तालुक्‍यात श्रमदानासाठी पुढाकार घेतला आहे. आशिव येथे संघटनेच्या वतीने आयोजित महाश्रमदान कार्यक्रमानिमित्त अभिनेता अतुल कुलकर्णी यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत सायंकाळी त्यांनी रामेगाव व याकतपूर येथे ग्रामसभा घेतल्या. या ग्रामसभेतून त्यांनी ग्रामस्थांना वास्तवाची जाणीव करून देत त्यांचे मनोधैर्य वाढविले. गावच्या विकासासाठी ग्रामस्थांनी स्वतःच पुढे येण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The joy of true labor is different