नातवाचा वाढदिवस खड्डे बुजवून साजरा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

नेताजी दातवाणी यांनी सोमवारी (ता. 11) शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून नातवाचा वाढदिवस साजरा केला. 

औरंगाबाद - वाढदिवस म्हणजे केक कापणे, आप्तेष्टांना भोजनासाठी निमंत्रित करणे, जल्लोष करणे असेच चित्र आपल्यासमोर उभे राहते; मात्र या पारंपरिक प्रथेला फाटा देत नेताजी दातवाणी यांनी सोमवारी (ता. 11) शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून नातवाचा वाढदिवस साजरा केला. 

समाजात वाढदिवसानिमित्त जल्लोष करण्याची प्रथा आहे. वाढदिवस जंगी पद्धतीने साजरा केला जातो, काही जण विधायक पद्धतीने म्हणजे विविध शाळांमध्ये अनाथ, अपंग, अंध मुलांच्या सोबत वाढदिवस साजरा करतात. वाढदिवसानिमित्त उपक्रमही घेतले जातात; मात्र या सर्वांपेक्षा वेगळा वाढदिवस असावा, समाजासाठी आपणही देणं लागतो, म्हणून खारीचा वाटा उचलता आला पाहिजे, अशी भावना दातवाणी यांची होती. शहरात प्रत्येक रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत, हे खड्डे बुजवून आपण काही प्रमाणात तरी दिलासा द्यावा म्हणून त्यांनी नातवाच्या वाढदिवसाला शहरातील खड्डे स्वखर्चाने बुजविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सूतगिरणी चौक आणि सूतगिरणी रस्त्याची निवड केली. त्यांनी अत्यंत जीवघेणे सहा खड्डे निवडले व ते स्वखर्चाने सिमेंट, रेती आणि खडी मिक्‍स करून बुजविले. सोमवारी रात्री अकरा वाजेपासून पहाटे तीनपर्यंत मजुरांच्या मार्फत त्यांनी खड्डे बुजवून आपल्या नातवाचा वाढदिवस साजरा केला. या त्यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. 
 

वाढदिवस किंवा कुठलाही कार्यक्रम असेल तर मोठ्या प्रमाणात वायफळ खर्च केला जातो. समाजात अनेक प्रश्‍न आहेत. हे अव्हान पेलण्यासाठी अनाठायी खर्च टाळून खारीचा वाटा प्रत्येकाने उचलला तर मोठे काम उभे राहू शकते. 
- नेताजी दातवाणी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social work on birthday

टॅग्स