सदाशिवगडावर अन्नछत्र निवारा उभारणी ; उद्योजक सलीम मुजावरांचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

या उपक्रमांत गडप्रेमी तसेच नागरिकांनी पूढाकार घेतला आहे. तसेच ट्रेकिंगच्या सदस्य गडावर बांधकामाचे साहित्य पोच करण्यासाठी मोलाची मदत करीत आहेत.

ओगलेवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले सदाशिवगड येथे मंदिर परिसरात अन्नछत्र निवारा उभारण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत उद्योजक सलीम मुजावर यांनी अन्नछत्र निवारासाठी पुढाकार घेतला असून, ते या वास्तूच्या उभारणीचा सर्व खर्च करणार आहेत.

 

सदाशिवगडाच्या संवर्धनासाठी 2007 पासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठान कार्यरत आहे. प्रतिष्ठानने गडावर गडाखालून पाइपलाइनद्वारे पाणी आणले असून, त्यासाठी 22 लाखांचा खर्च आला आहे. या कामासह लोकवर्गणी, गडप्रेमी नागरिकांच्या सहकार्याने लाखो रुपयांची कामे साकारण्यात आली आहेत. गडावरील महादेव मंदिरासमोर सभामंडप आहे.

पावसाळ्यात विशेषतः महाशिवरात्री, श्रावणी सोमवार यावेळी हा सभामंडप अपुरा पडतो. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विशेषतः महिला, शालेय विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. हेच ओळखून दुर्गप्रेमी उद्योजक श्री. मुजावर यांच्यापुढे प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुंभार, सचिव आबासाहेब लोकरे, राहुल जाधव, सुमित पळसे आदींनी अन्नछत्राचा विषय मांडला. त्याला त्यांनी लगेच होकार देवून स्वखर्चातून अन्नछत्र उभारण्याची ग्वाही दिली.

त्यानुसार अन्नछत्राचे भूमिपूजन श्री. मुजावर यांच्यासह प्रतिष्ठानचे मार्गदर्शक डॉ. सुभाष एरम, रश्‍मी एरम, जितेंद्र डुबल, कऱ्हाड मर्चंटचे व्यवस्थापक किशोर झाड, डॉ. अमित देशमुख, दिलीप दीक्षित, संदीप पाटील, प्रवीण जाधव, कैलास कदम, विवेक राव, राकेश पोरवाल, किरीट शहा, भूपेश मेहता, मितेश भंडारी यांच्यासह प्रतिष्ठानचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 

साहित्यासाठी गडप्रेमींची मदत 

अन्नछत्र उभारण्यासाठी आय चॅनेल, सी चॅनेल, खडी, सिमेंट, विटा यांसह सर्व साहित्य हजारमाचीत गडाच्या पायथ्याला आणण्यात आले होते. मागील आठवड्यापासून सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी पायथ्यापासून गडावर साहित्य नेण्यास सुरवात केली आहे. या सदस्यांना गडप्रेमी नागरिकांसह सोमवारी सायंकाळी नेटवर्क मार्केटिंगच्या 70 सदस्यांनी तर मंगळवारी सकाळी शिवराय ट्रेकिंगच्या सदस्यांनी साहित्य पोच करण्यासाठी मोलाची मदत केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Entrepreneur Salim Mujawar took initiative for erecting a canopy shelter Sadhashiv Gad