`रयत'च्या शाळांत पाच हजार पूरग्रस्तांना आसरा 

दिलीपकुमार चिंचकर
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील 24 गावांतील रयतच्या शाळांमध्ये पूरग्रस्तांना निवारा.

सातारा ः त्यागाची, गरजूंना मदतीचा हात देण्याची कर्मवीरांची शिकवण आजही रयत शिकवण जपली जात आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 24 गावांमधील शाळांत पाच हजार पूरग्रस्तांना आसरा देण्यात आला असून, त्यांना गरजेच्या साहित्यासह सर्व सुविधा शाळा आणि संस्थेच्या वतीने पुरविल्या जात असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी दिली. 
येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, तसेच कऱ्हाडच्या सद्‌गुरू गाडगे महाराज महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी चार टेंपो भरून आवश्‍यक दैनंदिन गरजेचे साहित्य जमा करून पूरग्रस्तांकडे  पाठविण्यात आले.  
सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीने अनेक नागरिक बेघर झाले आहेत. त्यांना अन्न पाण्यासह जीवनावश्‍यक वस्तूंची गरज आहे हे लक्षात घेऊन विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पैशातून धान्य, चादरी, ब्लॅंकेट, नवी कपडे, साड्या, तांदूळ, तूर डाळ, बिस्किटे, खाद्यतेल, पाणी असे दोन टेंपो भरून साहित्य जमा केले. हे साहित्य पूरग्रस्तांकडे पाठविण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand flood victims sheltered in 'Rayat' schools