...या शहरात जन्‍मणारी मुलगी ठरणार लखपती

भद्रेश भाटे
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

पंचावन्न वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री. शिंदे यांच्या घरात मुलगी जन्माला आली. त्या आनंदाप्रीत्यर्थ डी. एस. शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करण्याची योजना सुरू केली आहे. 
 

वाई (जि. सातारा) : समाजातील मुलींची घटती संख्या लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत आपल्या घरात मुलीचा जन्म झाला. या आनंदाप्रीत्यर्थ येथील डी. एस. शिक्षण संस्थेचे संस्थापक व माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी मुलीच्या जन्माचे अनोखे स्वागत करण्याची योजना सुरू केली आहे. 

मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे, म्हणून श्री. शिंदे यांनी "वीर' ही अभिनव योजना जाहीर केली असून, त्याअंतर्गत वाई शहराचे नागरिक असलेल्या कोणत्याही दाम्पत्याला मुलगी झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने 1111 रुपयांची बॅंक मुदत ठेवपावती करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे त्यांनी आपल्या घरात जन्मलेल्या नातीचे असे अनोखे स्वागत केले आहे. 

कन्‍यारत्‍नाचा आनंद

पंचावन्न वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर श्री. शिंदे यांच्या घरात मुलगी जन्माला आली. मुलगा जयदीप आणि स्नुषा स्वप्नाली यांना कन्यारत्न नुकतेच झाले. त्या आनंदाप्रीत्यर्थ त्यांनी ही योजना जाहीर केली आहे. लेक वाचावी, शिकावी व वाढावी, म्हणून संस्थेच्या माध्यमातून शहरात त्यांनी भीमराव शिंदे महिला महाविद्यालय सुरू केले आहे. या महाविद्यालयात अनेक गरीब व गरजू मुलींना मोफत शिक्षण दिले जाते.

बँकेत मुदतठेव पावती

याच विचाराने प्रेरित होवून अभिनव अशी "वीर' योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत वाई शहराचे नागरिक असलेल्या कोणत्याही दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाल्यास जन्माला येणाऱ्या मुलीच्या नावाने श्री. शिंदे 1111 रुपयांची बॅंक मुदत ठेवपावती करणार आहेत. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले. 

मोफत शिक्षणही देणार 

वाई शहरात जन्मलेल्या मुलीस संस्थेच्या ब्ल्यूमिंगडेल इंग्लिश मीडियम स्कूल, वाई या ठिकाणी प्री-प्रायमरीचे (नर्सरी, ज्युनियर व सिनियर केजी) मोफत शिक्षण देण्याचे श्री. शिंदे यांनी जाहीर केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Girl Born In This City Will Be Lakhpati