इथे... फुलपाखंराना मिळतोय हक्काचा निवारा...

सुधाकर काशीद
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा नव्हे, तर अक्षरश: शेकडो विविधरंगी फुलपाखरांच्या, चिमण्यांच्या वास्तव्याचा पत्ता झाला आहे.

कोल्हापूर -  फारूक म्हेतर... राहणार प्रायव्हेट हायस्कूलच्या पिछाडीस... शिवाजी स्टेडियमच्या बाजूला... हा पत्ता सर्वांना माहीत असायचं तसं कारण नाही. पण हा पत्ता कोल्हापुरातल्या बहुतेक फुलपाखरांना, चिमण्यांना, बुलबुल, युनिया पक्ष्यांना मात्र अगदी बरोबर माहीत आहे. कारण आता हा पत्ता केवळ फारूकच्या घराचा नव्हे, तर अक्षरश: शेकडो विविधरंगी फुलपाखरांच्या, चिमण्यांच्या वास्तव्याचा पत्ता झाला आहे. पटणार नाही, अगदी मध्यवस्तीतल्या या फारूकच्या घराला फुलपाखरांनी आपल्या हक्काचा निवाराच मानले आहे. अगदी अंडी, सुरवंट, कोष हे विविध रंगांत न्हाऊन निघालेलं फुलपाखरू असा त्यांचा सारा प्रवास येथूनच सुरू होत आहे. हे आपण निसर्गाशी जुळवून घेतलं तर काय घडू शकते, याचाच फारूकचे घर हा एक साक्षात्कार आहे.

फारूक म्हेतर हे मुळातच निसर्गप्रेमी. जंगल, डोंगर, दऱ्या-खोऱ्यात भटकंती आणि भटकंतीबरोबर तिथले पशू-पक्षी, मानवी जीवन अभ्यासण्याचा त्यांचा छंद. फुलपाखराच्या विविध रंगांनी तर ते वेडेच झाले. फुलपाखराच्या पंखांवर इतकी सुंदर आणि तीही दोन्ही पंखांवर समान आकारात नक्षी उमटतेच कशी, या कुतूहलाने ते त्याचा अभ्यास करू लागले. योगायोगाने त्यांच्या घराच्या पिछाडीस (परड्यात) मोकळी जागा होती. त्यांनी तेथे फुलपाखरांना आकर्षित करतील अशी फुलझाडे, जंगली झाडे लावली. पहिले वर्ष फुलपाखरू फिरकले नाही. त्यानंतर मात्र २० ते २२ प्रकारची फुलपाखरे त्यांच्या घराभोवती जणू पिंगाच घालू लागली. ही जागा आपल्यासाठी योग्य, सुरक्षित आणि चांगली असल्याचा अंदाज आल्याने झाडावर अंडी घालू लागली. 

अंड्यातून अळ्या, अळ्यातून कोष अशी टप्प्याटप्प्याने त्यांची वहिवाट सुरू झाली आणि या हा टप्पा पार करीत विविध रंगांची फुलपाखरे त्यांच्या घराच्या आवारातून आकाशाकडे झेपावू लागली.

फुलपाखरांची अंडी, त्यांच्या अळ्या, त्यांचे कोष यामुळे साहजिकच ते खाण्यासाठी चिमण्या, बुलबुल व इतर छोट्या पक्ष्यांचाही तेथे वावर वाढला. शंभरातले ७० ते ८० कोष हे पक्षी खातात; पण उरलेल्या १० ते २० कोषातून फुलपाखरू भरारी घेतात. कारण निसर्गातील अन्न साखळीचाच हा एक भाग असतो. साधारण जून, जुलैपासून त्यांच्या घराच्या आवारातील झाडावर फुलपाखराचे आगमन होते व त्यांच्या नवनिर्मितीची प्रक्रिया घडते. आता ऑक्‍टोबरचा शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा थंडी पडायला सुरुवात झाली. येथून पुढची ही थंडी फुलपाखरांना सहन होणारी नसते.

त्यामुळे आता फुलपाखरे फारूक म्हेतरांचे घर काही काळासाठी सोडून जाणार आहेत. अर्थात उन्हाळा सुरू झाला की पुन्हा परतणार आहेत. फारूक म्हेतर यांचं कोल्हापुरातलं हे आगळं-वेगळं घर आहे. अनंक किमती घरात कृत्रिम फुलपाखरे, कृत्रिम पक्षी, कृत्रिम वेली लावून सजावट केली जाते. पण हे घर निसर्गाचा एक घटक झाले आहे. फुलपाखरांना तर एवढं सवयीचं झालं आहे की, त्यांची भरारी येथे हक्काचीच  झाली आहे.

फुलपाखरू ही निसर्गाची वेगळी देण आहे. फुलपाखरू, त्याचे रंग, त्याचं भिरभिरणं हे सारं अमूल्य आहे. फुलपाखराच्या प्रेमात पडणार नाही, असा माणूस क्वचितच आहे आणि ही फुलपाखरे माझ्या घरात, परसात आनंदाने पिंगा घालतात हे नक्कीच वेगळे समाधान देणारे आहे.
- फारूक म्हेतर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Butter fly preservation