एक किलो तांबे धातूपासून कार मॉडेलची निर्मिती

एक किलो तांबे धातूपासून कार मॉडेलची निर्मिती

कोल्हापूर - बुद्धिमान मनुष्य अचूक लक्ष्यभेद करतो; पण अन्य कुणी हा लक्ष्यभेद करू शकतीलच असे नाही. जिनिअसही अचूक लक्ष्यभेद करतो; पण हा लक्ष्यभेद कुणी पाहू शकत नाही, असं ऑर्थर शॉपेनहॉवर म्हणतो, तर बर्नार्ड विलियम्सच्या म्हणण्यानुसार, बुद्धिमत्ता ही एखाद्या ज्योतीप्रमाणे असते. त्याचप्रमाणे जिनिअस हा अग्निप्रमाणे काम करत असतो. म्हणूनच दर्शन जाधव हासुद्धा ऑर्थर आणि बर्नार्डच्या ‘जिनिअस’ या व्याख्येत ‘परफेक्‍ट’ बसतो. नाना पाटीलनगर येथे राहणाऱ्या दर्शनने एक किलो तांब्याच्या धातूच्या पत्र्यापासून उत्कृष्ट असे कारचे मॉडेल तयार केले आहे. हे मॉडेल साकारण्यासाठी दर्शनला आठ महिन्यांचा कालावधी लागला. अखेर एका स्विचवर सुरू होणारे हे मॉडेल जानेवारीच्या आठ तारखेला तयार झाले. एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये तो इयत्ता नववीत शिकत आहे. 

एरव्ही कोऱ्या करकरीत कॅन्व्हासवर ब्रशच्या फटकाऱ्याने निसर्ग, व्यक्तिचित्रे साकारणाऱ्या दर्शनने कारचे मॉडेल तयार करण्याचा निश्‍चय केला. हे मॉडेल कसे तयार करायचे, यासाठी कोणत्या वस्तू वापरायच्या याचा दर्शनने कसून अभ्यास केला. प्रथम कागदावर कारची ड्रॉईंग तयार केली. ड्रॉईंगप्रमाणे कारच्या निर्मिती करायला सुरवात केली. सर्वप्रथम दर्शनने लाकडाचा वापर करून मॉडेल तयार केले; पण हे मॉडेल म्हणावे तशी गती घेत नव्हते. मग बाजारातून एक किलो तांब्याच्या धातूचा पत्रा खरेदी केला. हा पत्रा जाडजूड कात्रीने कापून विविध आकाराचे तुकडे तयार केले. हे तुकडे जोडून कारची निर्मिती केली. अर्थात, ही निर्मिती बसल्या बैठकीत झालेली नाही, तर शाळा, घरातील अन्य कामे, अभ्यास सांभाळून कार तयार केली. कारला पुढे बॉनेट, मागे डिकी आहे. विशेष म्हणजे पुढे दोन आणि मागे चार व्यक्ती बसू शकतील, असे हे मॉडेल आहे. मॉडेलमध्ये दोन मोटर जोडलेल्या आहेत. एक स्विच असून, हेडलाईटही जोडलेले आहेत. स्विच ऑन केला, की ही कार सुरू होते. चारही दरवाजे आपोआप उघडतात. दोन मोबाईल बॅटरीचा उपयोग केला आहे.

वडील श्री. रमेश यांच्याबरोबर आई सौ. आशा यांचे मार्गदर्शन दर्शनला लाभले. दर्शनला वाचनाचीही आवड असून, दर शनिवारी, रविवारी तो रंकाळा चौपाटीवर जाऊन स्क्रॅच पेपर्सचा वापर करून नावापासून एका मिनिटात गणपतीचे चित्र तयार करून देतो. एका दिवसात तो १०० ते २०० गणपतीची चित्रे तयार करतो. अनेकजण स्वत:चे नाव सांगून गणपतीचे चित्र तयार करून घेतात. विशेष म्हणजे, गणपती तयार करण्याचे व्हिडिओज्‌ यु ट्यूबवरही पाहायला मिळतात.  

‘‘केवळ ‘अँटिक’ पीस म्हणून मी कार मॉडेलच्या निर्मितीकरिता तांबे धातूचा वापर केला. यासाठी दोन हजार रुपये खर्च आला. वडील रमेश जाधव यांचा घरगुती चांदीकामाचा व्यवसाय आहे. यामुळे वडिलांनी मला कारच्या निर्मितीत खूप मदत केली. डिझाईनप्रमाणे प्लेट कापून तयार केल्या. यानंतर गॅस वेल्डिंगचा वापर करून प्लेट एकमेकींशी जोडल्या. जून महिन्यापासून हे काम सुरू होते. तांबे धातूनंतर मी पुढील काळात एक किलो चांदीचा वापर करून कार तयार करणार आहे.’’ 
- दर्शन जाधव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com