गणेश जयंती प्रथा, परंपरेच्या पलीकडची...

गणेश जयंती प्रथा, परंपरेच्या पलीकडची...

कोल्हापूर - गणेश जयंती म्हटलं, की मोठा सोहळा, महाप्रसाद, भजन कीर्तन हे आता ठरूनच गेले आहे. किंबहुना गणेश जयंती हा एक सोहळाच झाला आहे; पण हा पारंपरिक सोहळा जपता जपता प्रथा, परंपरेच्या पलीकडे जाऊन शुक्रवार पेठेतील न्यू शिवनेरी तरुण मंडळ गणेश जयंती साजरी करत आहे. या मंडळाने जयंतीच्या धार्मिक विधीइतकेच सामाजिक ऐक्‍याच्या उपक्रमाला स्थान दिले आहे. यंदा गणेश जयंतीच्या खर्चातला मोठा वाटा बाजूला ठेवून त्यातून अंबाईच्या धनगरवाड्याला मदतीचा हात दिला. 

ही मदत म्हणजे फार मोठे काम नाही, हे प्रांजळपणे कबूल करत या मंडळाने ही मदत म्हणजे डोंगरदऱ्यात, रानावनात, वाड्यावस्तीत राहणाऱ्या बांधवांना जवळ करण्याचा एक छोटा प्रयत्न असल्याचा कृतज्ञतापूर्वक दावा केला. विशेष हे, की आपण शहरात राहणारे लोक एक दिवस पाणी आले नाही, तासभर विद्युतपुरवठा खंडित झाला, डांबरी रस्त्यावर खड्डा पडला, की गदारोळ सुरू करतो; पण हे आपलेच बांधव वाड्यावस्तीवर कसे जीवन काढतात, हे आपल्यासारख्या पांढरपेशी लोकांनी पाहावे म्हणून मदत देण्यासाठी ते भागातील लोकांना सहकुटुंब घेऊन जाणार आहेत.

मानबेटमधील कुटुंबाला सौरकंदील...
मानबेटमध्ये हत्तीने धुडगूस घातलेल्या परिसरातील दोन कुटुंबांना मंडळातर्फे सौरकंदील देण्यात येणार आहेत. मानबेटमधील या धनगरवाड्यात लाईटची सोय नाही; पण तेथे दोन कुटुंबे राहतात. त्यांना हे सौरकंदील दिले जाणार आहेत.

यावर्षी अंबाईचा धनगरवाडा हे ठिकाण मंडळाने निश्‍चित केले. हा धनगरवाडा चांदोली राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पाजवळ आहे. चांदोलीपासून दाट जंगलात जाणारी वाट धनगरवाड्यात जाते. तेथे १५० घरे आहेत. व्याघ्र प्रकल्पालगतच ही वस्ती असल्याने त्यांच्यावर खूप निर्बंध आहेत. व्याघ्र प्रकल्पातले नैसर्गिक वातावरण बिघडू नये, म्हणून या धनगरवाड्यात लाईट, पक्के रस्ते या सुविधाही नाहीत. त्यामुळे दिवस मावळला, की हे गाव हळूहळू शांत होते.

१५० घरांत भांडी, साड्या मुलांना कपडे, स्वेटर
धनगरवाड्यावरील १५० घरांत जेवणाची भांडी, सर्व घरांत रग, १५० महिलांना साड्या, मुलींना ड्रेस, मुलांना टी शर्ट बर्मुडा व लहान मुलांना स्वेटर देण्यात येतील.

लोक घराची दारे बंद करतात. वन्यप्राण्यांच्या वावरामुळे रात्री क्वचितच बाहेरच पडतात. अनेक तरुण रोजगारासाठी कोल्हापूर, मुंबई, इचलकरंजीत राहतात. गावात एसटीची सोय नाही. त्यामुळे लोक सात ते आठ किलोमीटरची पायपीट करतात. माध्यमिक शिक्षण घेणारी मुले एकएकटी शाळेत न जाता गटागटानेच शाळेत जातात. एका झऱ्याचे पाणी पिण्यासाठी व इतर कारणांसाठी वापरतात.

या परिसराची ही स्थिती पाहून न्यू शिवनेरी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश जयंतीला या धनगरवाड्यात मदतीचा हात देण्याचे ठरवले. गणेश जयंतीचे कार्यक्रम त्यांनी साजरे केले; पण धनगरवाड्यातील बांधवांना मदतीचा हात हे गणेश जयंतीचे ध्येय ठरवले. साधारण सव्वा लाख ते दीड लाखाचे हे साहित्य पुढच्या आठवड्यात वाटण्यात येणार आहे. गणेश जयंतीचा सोहळा यापेक्षा आणखी चांगला काय असणार आहे. एवढीच चार शब्दात या मंडळाचे अध्यक्ष मोहन सरवळकर यांची प्रतिक्रिया आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com