बघता बघता... जमली साडेदहा हजारांवर पुस्तके

लुमाकांत नलवडे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - ‘एक घर - एक पुस्तक’ हा उपक्रम २३ जूनला प्रत्यक्षात आला. बघता बघता आज साडेदहा हजारांहून अधिक पुस्तके जमा झाली. ८ नोव्हेंबरला याच पुस्तकांचे वाचनालय मुक्त सैनिक वसाहत येथे सुरू होत आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आज इतकी वाढली की, पुढील पोस्ट ‘वेटिंग’ची वेळ आली. कोल्हापुरातून सुरू झालेल्या चळवळीला थेट रशियातूनही प्रतिसाद मिळाला.

कोल्हापूर - ‘एक घर - एक पुस्तक’ हा उपक्रम २३ जूनला प्रत्यक्षात आला. बघता बघता आज साडेदहा हजारांहून अधिक पुस्तके जमा झाली. ८ नोव्हेंबरला याच पुस्तकांचे वाचनालय मुक्त सैनिक वसाहत येथे सुरू होत आहे. केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेली चळवळ आज इतकी वाढली की, पुढील पोस्ट ‘वेटिंग’ची वेळ आली. कोल्हापुरातून सुरू झालेल्या चळवळीला थेट रशियातूनही प्रतिसाद मिळाला.

‘वाचेल तो वाचेल’ हा ‘स्लोगन’ फारच प्रसिद्ध झाला. काही वाहनांवर सुद्धा हा स्लोगन लिहिला. वाचनानंतर विचार बदलतात आणि विवेक वाढतो. हाच मुद्दा लक्षात घेऊन कोल्हापुरातील तरुण कार्यकर्त्यांनी ही चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. २३ जूनला उमा गोविंद पानसरे यांच्या हस्ते पहिले पुस्तक घेऊन चळवळ सुरू झाली. बघता बघता चार महिन्यांत साडेदहा हजारांहून अधिक पुस्तके ‘एक घर - एक पुस्तक’ उपक्रमात दाखल झाली. दोघा-तिघांनी स्वतःच्या मोबाईल क्रमाकांसह हा उपक्रम व्हॉटस्‌ ॲपसह अन्य सोशल मीडियावर पोस्ट करून जनजागृतीला सुरुवात केली.

दिवसात दीड-दोनशे जणांचा प्रतिसाद मिळाला. ज्यांनी पुस्तके दिली, ती स्वीकारताना त्याचे फोटो घेऊन ते पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केले. बघता बघता गुणाकाराच्या पटीत चळवळीला प्रसिद्धी मिळाली. पुस्तक भेट दिलेल्यांचे फोटो वेगवेगळ्या ग्रुपवर फिरत राहिले. अनेकांनी या चळवळीला पाठिंबा देत स्वतःहून पुस्तक भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. आज हा उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत आहे. सोशल मीडियावर प्रतिसाद मिळत आहे. काहींनी पुस्तके भेट दिलेले फोटो पोस्ट करण्यासाठी वेटिंग लागले. ‘एक घर - एक पुस्तक’ या उपक्रमातून जमा झालेली पुस्तके एकत्रित केली. 

उपक्रमात प्रशांत आंबी,  कृष्णा पानसे, धीरज कठारे, आरती रेडेकर, अमोल देवडकर, दिलदार मुजावर, सुशील शिंदे, शिवप्रसाद शेवाळे, सौरभ टिवाळ, शक्ती कांबळे, नितीन भाले, विशाल जाधव, गिरीश फोंडे यांच्यासह इतर तरुणांनी एकत्रित येऊन हा उपक्रम यशस्वी केला आहे.

रशियातून पुस्तक जमा
‘एक घर - एक पुस्तक’ या उपक्रमात रशियातून एक पुस्तक दाखल झाले. व्हेलेरिया दुराव्हीना या तरुणीच्या ग्रुपने हे पुस्तक भेट दिले आहे. हा उपक्रम नक्कीच बदल घडवून आणणारा असल्याचेही त्यांनी आवर्जून म्हटले आहे. उपक्रमातील गिरीश फोंडे रशियाला गेले असता तेथे हे पुस्तक भेट देण्यात आले. 

रद्दीतून वाचनालय
आवश्‍यक कपाटे व इतर साहित्यसुद्धा रद्दीतून मिळविले. कार्यालये, हॉटेल, बॅंक, हॉस्पिटल अशा सर्व ठिकाणी जमा होणारी रद्दी द्यावी, यासाठी केवळ मिस कॉल द्यावा, आवाहनाला प्रतिसादातून तब्बल साडेअकरा हजारांची रद्दी जमा झाली. जिल्ह्यात दहा वाचनालये सुरू करण्याचा मानस असल्याचे प्रशांत आंबी यांनी सांगितले. उपक्रमातील पहिले वाचनालय ८ नोव्हेंबरला मुक्त सैनिक वसाहतीत सुरू होत आहे. यासाठी आवश्‍यक साहित्यही रद्दीतून जमा केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News One home one book Campaign