मुक्‍या जनावरांचा देवदूत... राजकुमार बागल.

संदीप खांडेकर
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - मांजात कबूतर अडकलेले असो, पक्ष्याचे पंख मोडलेले असोत अथवा बैलाचा पाय मोडलेला असो, अशा वेळी करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्या वेळी एक नाव नजरेसमोर येते, ते म्हणजे राजकुमार विश्‍वासराव बागल. पांजरपोळ संस्थेत जनावरांच्या देखभालीचा ३७ वर्षांचा प्रवास करणारे बागल जनावरांचे देवदूत बनले आहेत.

कोल्हापूर - मांजात कबूतर अडकलेले असो, पक्ष्याचे पंख मोडलेले असोत अथवा बैलाचा पाय मोडलेला असो, अशा वेळी करायचे काय? असा प्रश्‍न अनेकांना पडतो. त्या वेळी एक नाव नजरेसमोर येते, ते म्हणजे राजकुमार विश्‍वासराव बागल. पांजरपोळ संस्थेत जनावरांच्या देखभालीचा ३७ वर्षांचा प्रवास करणारे बागल जनावरांचे देवदूत बनले आहेत.

जनावरांवर उपचार करणे असो की त्यांची देखभाल ही कामे करताना वाट्याला आलेल्या करुणामय अनुभवाने कृतार्थतेचे जीवन जगत असल्याचे ते सांगतात. 

प्रसंग पहिला :

टाऊन हॉल बागेत पंखाला इजा झालेला पाणकावळा एका पक्षीप्रेमीला आढळला. तो त्याने राजकुमार बागल यांचे भाऊ संजय बागल यांच्याकडे सुपूर्द केला. या पाणकावळ्यावर राजकुमार बागल यांनी आठवडाभर उपचार केले. त्याला खाण्यासाठी मासे दिले. पाणकावळा आठवडाभरातच बरा झाला. त्याला सोडण्यासाठी बागल व त्यांचा मुलगा अजिंक्‍य कोटीतीर्थ तलावावर गेले. तलावाच्या काठावर उभे राहून त्यांनी पाणकावळ्याला पाण्यात सोडले. पाणकावळा सुमारे पन्नास फूट पुढे गेला आणि अचानक मागे फिरला. पुन्हा त्यांच्याजवळ आला. दोघांनी त्याला जवळ घेत त्याच्या डोक्‍यावरून हात फिरवला आणि त्याला तलावात सोडले. 

प्रसंग दुसरा :

म्हशीच्या शर्यतीत कायम विजेती ठरणारी वायसर नावाची म्हैस अचानक आजारी पडली आणि ती तब्येतीने हादरली. तिचा भार मालकाला सोसेना. त्याने तिला पांजरपोळ संस्थेत दाखल केले. बागल यांनी तिच्यावर उपचार सुरू केले आणि महिना-दोन महिन्यांत म्हशीची तब्येत सुधारली. पुढे त्या म्हशीने एका रेडीला जन्मही दिला. ही वार्ता म्हशीच्या मूळ मालकाच्या कानावर गेली. तो पुन्हा ती म्हैस नेण्यास पांजरपोळ संस्थेत आला. ‘म्हैस राहू दे रेडी तर द्या’, अशी विनंती करू लागला. पण संस्थेने तसे करता येणे शक्‍य नसल्याचे सांगताच त्याने राजकीय लोकांचा वशिल्याने रेडी मिळवण्याचा प्रयत्न केला.

जनावरांच्या सेवेत तिसरी पिढी...
राजकुमार बागल यांच्या निमित्ताने बागल घराण्याची तिसरी पिढी जनावरांच्या सेवेत आहे. त्यांचे आजोबा दत्ताजीराव खंडेराव बागल, वडील विश्‍वासराव दत्ताजीराव बागल यांनी जनावरांची देखभाल केली. बारावीनंतर डेअरी फर्म मॅनेजमेंट व ॲनिमल हजबंडरीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले राजकुमार जनावरांची देखभाल करतात. अजिंक्‍य राजकुमार बागल, संजय बागल, प्रतीक्षा बागल हेही जनावरांची काळजी घेतात. संस्थेचे अध्यक्ष रमणभाई पटेल व सचिव बाळासाहेब मनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज सुरू आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Rajkumar Bagal Angel for animals

टॅग्स