फाेन येत गेले, रोपे रुजत गेली...

फाेन येत गेले, रोपे रुजत गेली...

कोल्हापूर - फक्‍त एक फोन करायचा. ठिकाण सांगायचे. झाडाचे एक रोप, कुदळ, फावडे, बुट्टी घेऊन तो हजर. मग तो खड्डा काढतो. तेथे तुमच्या हस्ते झाड लावतो. जाताना झाड जगवण्यासाठी आवश्‍यक त्या सूचना देतो. एवढेच नव्हे तर तुम्ही ते झाड जगवलंय की नाही, याचा दोन महिने काटेकोर पाठपुरावा करतो. अशा पद्धतीने त्याने आजअखेर १००० झाडे लावली आहेत. 

झाड लावणे सोपे आहे; पण ती सर्व झाडे त्याने जगवली आहेत. उद्या तो पर्यावरण दिन आणि त्याच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १००१ वे झाड लावणार  आहे. जणू तो झाडांच्या या प्रेमापोटी झपाटलेलाच आहे. त्याच्या मित्रांनी तर त्याला झपाटलेलं झाडच ठरवले आहे. 

प्रतीक बावडेकर या ध्येयवेड्या तरुणाची ही हिरवीगार टवटवीत कथा आहे. तो एका सराफाचा मुलगा. त्याचा बंगला ऐसपैस. म्हटलं तर तो बंगल्याच्या आवारात पन्नास झाडे लावून निसर्गाचा आनंद घेऊ शकतो. पण त्याने ठरवले, आपण जमेल तेथे झाड लावायचे व जगवायचे. त्यासाठी त्याने सुरुवातीला मित्र परिवार, नातेवाईकांचा आधार घेतला. त्याने १४ मे २०१६ रोजी फेसबुक, व्हॉटस्‌ॲपवर तुम्ही मला फक्‍त एक फोन करा, असे आवाहन केले. ज्यांचे ज्यांचे फोन आले, त्यांना प्रतीक याने मी तुमच्या जागेत माझ्या खर्चाने, माझ्या श्रमाने झाड लावू इच्छितो, असे सांगितले. 

बहुतेकांनी त्याची विनंती मान्य केली. बघता बघता पहिल्या महिनाभरात पन्नास झाडे लावली. ही संख्या दोन वर्षांत ९९९ वर पोहोचली.प्रतीकला फोन केला की तो तुमची जागा विचारतो व बरोबर वेळ कळवून तेथे स्वत:च्या मोपेडवर, कधी जीपमध्ये झाडाचे रोप, फावडे, खोरे, बुट्टी घेऊन पोहोचतो. सुरुवातीला तोच खड्डा काढायचा. आता त्याला लोकही मदत करतात. तो आवळा, चिंच, जांभूळ, बेहडा, वड, पिंपळ, करंज, फणस अशी देशी झाडेच लावतो. कोणी शोचे झाड लावा, म्हटले तर नम्रपणे नकार देतो. सकाळी सात ते दहा या वेळेतच तो हे काम करतो. दहानंतर दिवसभर गुजरीत आपल्या सराफी दुकानात बसतो. 
त्याने लावलेली ९९९ झाडे जगली आहेत. चार-पाच झाडे कोणीतरी उपटून नेली. त्याने तेथे जाऊन पुन्हा लावली आहेत. जमेल तितकी वर्षे तो हे काम करणार आहे. 

झाडांबद्दल मला फारशी शास्त्रीय माहिती नाही. पण झाड, त्याची हिरवीगार पाने, झाडाची सावली, झाडवरची फुले, फळे, झाडावरचे पक्षी यात नक्‍कीच काही तरी जादू आहे. झाडाखाली बसून खोलवर श्‍वास घ्या, बघा किती तरतरी येते. त्यामुळे मी जमेल तितकी, जमेल त्या जागी झाडे लावणार आहे आणि जगवणार आहे. काही लोक वेड्यात काढतात. पण मी झाडासाठी वेडाच आहे. 
- प्रतीक बावडेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com