दिव्यांग आदित्यची प्रेरणादायी कहाणी

बलराज पवार
सोमवार, 16 एप्रिल 2018

‘दिव्यांग’ असणे म्हणजे खरे तर अपंगच, पण समाजाला तोंडात बोटे घालायला लावणारी दिव्य कामगिरी ते करतात. वयाच्या सातव्या वर्षी ‘मस्क्‍युलर डिस्टपी’ या आजाराने ग्रासून शरीराची हालचालच थांबलेल्या आदित्य निकमने त्यावर जिद्दीने मात करत २७ व्या वर्षी स्वतःची आर्ट गॅलरी उभारली आहे. त्याचा हात कॅन्व्हासवर इतर चित्रकारांसारखा झरझर फिरत नाही, पण त्याची चित्रे त्याच्यातल्या अजोड चित्रकाराची साक्ष देतात. हाच आदित्य निकम आज त्याच्या पिढीसाठीच नव्हे तर समाजासाठी प्रेरणा ठरत आहे...

आदित्य राजन निकम...वयाच्या सातव्या वर्षापर्यंत सामान्य मुलांप्रमाणे तो मुक्तपणे बागडत होता. एक दिवस त्याला गनिमी काव्याने आलेल्या दुर्धर आजाराने गाठले. ‘मस्क्‍युलर डिस्टपी’ या आजाराने त्याच्या हाता-पायाची हालचाल थांबली. आदित्यच्या आई-वडिलांसाठी हा मोठा धक्का होता.

एकुलता एक मुलगा एका विचित्र आजाराच्या गर्तेत सापडल्यानंतर त्यांनी कच न खाता मोठ्या धीराने आदित्यला सावरले. त्याला अपंगत्व विसरून जगण्यासाठी आशेचा किरण आई डॉ. नंदिनी आणि पिता राजन यांनी दाखवला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. पी. बी. पाटील आणि प्राचार्या सरोज पाटील यांचा आदित्य नातू आहे. नातवाने चित्रकलेत नाव कमवावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची स्वप्नपूर्ती करण्यासाठी आदित्य रंगरेषांत रमून जातो.आदित्यला चित्रकलेची आवड होती. त्यामुळे त्यांनी आदित्यच्या हातात ब्रश दिला, त्याच्यासमोर कॅनव्हास ठेवला.

चित्रकला माझी आवड आहे. अपंगत्व येऊनही आई-वडिलांसह मित्रांनी दिलेली साथ आणि आधार यामुळे मी आज इथंवर आलो. पेंटिंग क्षेत्रात आपल्या नातवाने कमवावे ही आजी-आजोबांची इच्छा पूर्ण करण्याची माझी महत्त्वाकांक्षा आहे, तसेच नवोदित कलाकारांसाठीही काम करण्याची माझी धडपड सुरू असते.
- आदित्य निकम

आदित्य त्यावर हळूहळू चित्रे काढू लागला. सांगलीत शांतिनिकेतनच्या कलाविश्व महाविद्यालयात जीडीआर्टचे शिक्षण घेतले. डिपीडीईचे शिक्षण पूर्ण केले. या काळात आदित्यची चित्रकलाही बहरत गेली. फिगरेटिव्ह प्रकारातील चित्रे तो काढतो. पुणे येथील प्रसिद्ध चित्रकार किशोर पांगरे हे त्याचे गुरू. हाताची हालचाल वेगात होत नसल्याने त्याला चित्रे काढण्यासाठी वेळ लागतो, पण चिकाटीने तो चित्र पूर्णत्वाला नेतो. तहान भूक हरपून चित्रात जीव ओततो.

आज वयाच्या २७ व्या वर्षीच स्वतःची ‘मिस्टी रोझ’ ही आर्ट गॅलरी उभारली आहे. गॅलरीत आदित्यची निवडक पेंटिंग्ज लावली आहेत. सेमीएरिलॅस्टिक हे आदित्यच्या पेंटिंगचे वैशिष्ट्य असून त्याची स्वतंत्र शैली आहे. आजपर्यत पेंटिंगमध्ये न पाहिलेल्या छटा आदित्यच्या पेंटिंगमध्ये दिसून येतात. त्याच्या चित्रांमधील रंगांच्या छटा वेगळीच अनुभूती देतात. ही चित्रे काढणारा आदित्य ‘अपंग’ आहे हे सांगूनही पटणार नाही.

अलीकडेच जहाँगीर आर्ट गॅलरीत एका प्रदर्शनासाठी त्याची दोन चित्रे होती. त्यातील एक चित्र विक्रीही झाले. त्याच्या स्वत:च्या चित्रांचे प्रदर्शन जहाँगीर आर्ट गॅलरीत पुढील वर्षी होणार आहे. नवोदित कलाकारांसाठी त्याने नुकतीच एक स्पर्धाही आयोजित केली होती आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्याने विजेत्यांना रोख बक्षिसेही दिली. नवोदित कलाकारांना प्रदर्शनासाठी ‘मिस्टी रोझ आर्ट गॅलरी’ उपयोगी पडावी, अशी त्याची इच्छा आहे. गरजू कलाकारांना गॅलरी मोफत देतो.

दिव्यांग असणे हा शाप आहे असे कुणी मानतात, पण आदित्यने त्यालाच ‘वरदान’ ठरवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्याची जिद्द आणि धडपड ही आजच्या स्पर्धेच्या जगात निराशेने, मनाने ‘अपंग’ झालेल्यांसाठी संजीवनी ठरणारी प्रेरणा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News handicap Aditya Nikam success story