माणुसकीच्या सायकलला ‘मैत्र’चे ‘पॅडल’

संतोष भिसे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

मिरज - पुणेकर महिलांच्या मैत्र ग्रुपने सायकलीला माणुसकीचे पॅडल जोडले आणि आरगेतील शाळकरी मुलांच्या आयुष्यात हास्य फुलले. अडगळीत पडलेल्या सायकली दान करण्याचे आवाहन या महिलांनी केले, त्या सायकलींची डागडुजी केली आणि एक-दोन किलोमीटर पायपीट करून शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या भेट दिल्या.

मिरज - पुणेकर महिलांच्या मैत्र ग्रुपने सायकलीला माणुसकीचे पॅडल जोडले आणि आरगेतील शाळकरी मुलांच्या आयुष्यात हास्य फुलले. अडगळीत पडलेल्या सायकली दान करण्याचे आवाहन या महिलांनी केले, त्या सायकलींची डागडुजी केली आणि एक-दोन किलोमीटर पायपीट करून शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या भेट दिल्या. प्रजासत्ताकदिनी हा सोहळा रंगला. लोकांनी लोकांच्या सहभागाने लोकांसाठी चालविलेली ही योजना खरेच कौतुकाचा विषय ठरतेय. 

मैत्र ग्रुपची स्थापना फेब्रुवारी २०१६ ची. मेधा अजय पूरकर यांनी तो स्थापला. मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन महिलांसाठी तो काम करायचा. आधी पंधरा सदस्य होत्या. आता ऐंशीहून अधिक आहेत. सहा शाखांतून आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्वावलंबन या विषयांत काम चालते. दोन महिन्यांपूर्वी सिम्बॉयसिस कॉलेजचे अधिव्याख्याता आशीष देशपांडे यांच्याशी पूरकर यांचा संवाद झाला.

ग्रामीण भागात मळाभागातील मुले शाळेत जाईपर्यंत दमून जातात. काहींना शाळा सोडावी लागते. त्यांना वाहन मिळत नाही. ‘मैत्र’ने त्यासाठी हात पुढे केला. एक विधायक उपक्रम आम्ही करू शकलो. भविष्यातही मैत्र विविध मार्गांनी निश्‍चित मदतीचा हात देईल.
- मेधा पूरकर, 

‘मैत्र’च्या प्रवर्तक

‘मैत्र’द्वारे ग्रामीण शाळकरी मुलांसाठी काय करू शकता, अशी त्यांनी विचारणा केली. पूरकर यांच्यासाठी हा प्रश्‍न नवचेतना देणारा आणि ‘मैत्र’चे पंख विस्तारणारा होता. तेथून या कल्पनेचा जन्म झाला. शहरातील अपार्टमेंटमध्ये अडगळीत आणि टेरेसवर पडून असणाऱ्या सायकली त्यांच्या डोळ्यांसमोर आल्या. पुणेकरांनी अवघ्या महिन्याभरात वीस सायकली दिल्या. ‘मैत्र’ने त्यांचे वाटप करण्यास आरग शाळेची निवड केली. 

पुण्यातील मुले कॉलेजात जाऊ लागताच सायकलीचा वापर बंद करतात. त्या कोपऱ्यात पडून राहतात. त्यांचे काय करायचे, हा पालकांसमोर प्रश्‍न असतो. पूरकर यांच्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिला. ‘आपली सायकल शेतकऱ्यांच्या दारी’ ही मोहीम व्हॉटस्‌ॲपद्वारे फिरली. वीस सायकली मिळाल्या. सर्वच सुस्थितीत होत्या. किरकोळ डागडुजी करावी लागली. ‘मैत्र’ने प्रा. देशपांडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या विनंतीनुसार आरगमधील विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा निर्णय झाला. पुण्यातील मेघना दंताळे यांनी आपले वाहन आणि एक मदतनीस दिला. १९ आणि २० जानेवारीला पुण्यात फिरून सायकली गोळा केल्या. आरगमधील अमर पाटील यांनी सायकली गावात आणण्यासाठी वाहन दिले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News maitra Group help to school boys