सोशल मिडीयाने विणले माणुसकीचे धागे 

संतोष भिसे
सोमवार, 2 एप्रिल 2018

मिरज - शासकीय नोकरी करत असताना चाकोरीबाहेर जाऊन काम केले कि माणुसकीचे धागे कसे विणता येतात याचे सुंदर उदाहरण येथील शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. पन्नास वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. ठाकठिक झाल्यावर त्याचा ठावठिकाणा शोधला. तब्बल दिड हजार किलोमीटरचा प्रवास करुन छत्तीसगडमधील नातेवाईकांनी त्याची गळाभेट घेतली. 

मिरज - शासकीय नोकरी करत असताना चाकोरीबाहेर जाऊन काम केले कि माणुसकीचे धागे कसे विणता येतात याचे सुंदर उदाहरण येथील शासकीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी घालून दिले आहे. पन्नास वर्षे वयाचा अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल झाला होता. डॉक्‍टरांनी त्याच्यावर उपचार केले. ठाकठिक झाल्यावर सोशल मिडीयावरून त्याचा ठावठिकाणा शोधला. तब्बल दिड हजार किलोमीटरचा प्रवास करुन छत्तीसगडमधील नातेवाईकांनी त्याची गळाभेट घेतली. 

प्रमोद राम नावाचा हा गृहस्थ 12 मार्च रोजी जखमी अवस्थेत बेवारस म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल झाला. 108 रुग्णवाहीकेने मिरज - कोल्हापूर रस्त्यावरील अंकली परिसरातून त्याला रुग्णालयात आणले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर तो बरा झाला. पण त्याची मानसिक स्थिती ओळख सांगण्याजोगी नव्हती. त्यामुळे त्याला मानसोपचार कक्षात दाखल केले. समाजसेवा अधिक्षक डॉ. सूर्यप्रकाश राऊत आणि संतोष मुंगल यांनी त्याला विश्‍वासात घेतले. धीर दिला; तेव्हा त्याने त्रोटक माहिती दिली. मुळचा झारखंड येथील असून काही मित्रांसमवेत रोजगारासाठी महाराष्ट्रात आल्याचे त्याने सांगितले. कोल्हापुरात बांधकाम मजूर म्हणून तो काही दिवसांपासून काम करत होता. एके दिवशी शहरातून भटकला आणि अपघात होऊन अंकली परिसरात बेशुद्धावस्थेत पडला. 

ही माहीती मिळाली तरी त्याचे नेमके गाव स्पष्ट होत नव्हते. फक्त झारखंड राज्याचा रहिवासी इतक्‍या माहितीवर रुग्णालय प्रशासनाने सुतावरुन स्वर्ग गाठण्याचा निर्णय घेतला. त्याचे छायाचित्र सोशल मिडीयाद्वारे व्हायरल केले. विशेषतः झारखंड राज्यातील काही ग्रुपवर फिरवले. याकामी तेथील डॉक्‍टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदत केली. त्याला यश मिळाले. झारखंडमधील डाली ( ता. छत्तरपूर, जि. पलामू ) येथे त्याचे घर व कुटुंबीय असल्याचे स्पष्ट झाले.

प्रमोदचा भाऊ रमेश राम याने मिरज शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला. ओळख पटवून दिली. ते कुटुंबासह मिरजेत आले व प्रमोदला ताब्यात घेतले. कित्येक दिवसांपासून दुरावलेल्या भावाशी गळाभेट घेतली. याकामी निवासी वैद्यकीय अधिकारी मेघा भिंग्रा, अधिष्ठाता पल्लवी सापळे, उपअधिष्ठाता डॉ गायकवाड, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रकाश धुमाळ, सुबोध उगाणे, डॉ दत्ता भोसले, समाजसेवा अधिक्षक भुषणी दीप आदींनी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli News Miraj Civil help to Zharkhand Patient