दृष्टिहीनाकडून शेकडो अंधांच्या आयुष्यात ‘प्रकाश’

सुवर्णा येनपुरे-कामठे
रविवार, 10 जून 2018

पुणे - जन्मतःच ते अंध. त्यात घरची परिस्थिती हलाखीची... असा सारा अंधारच; पण केवळ जिद्दीच्या जोरावर अंधाराची कवाडं दूर करीत त्यांनी यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत मजल मारली. अर्थात ही भरारी घेतानाच आपल्यासारख्या शेकडो दृष्टिहीनांच्या हातांना काम देत त्यांनी त्यांच्याही आयुष्यात प्रकाशाची  पेरणी केली. 

पुणे - जन्मतःच ते अंध. त्यात घरची परिस्थिती हलाखीची... असा सारा अंधारच; पण केवळ जिद्दीच्या जोरावर अंधाराची कवाडं दूर करीत त्यांनी यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत मजल मारली. अर्थात ही भरारी घेतानाच आपल्यासारख्या शेकडो दृष्टिहीनांच्या हातांना काम देत त्यांनी त्यांच्याही आयुष्यात प्रकाशाची  पेरणी केली. 

जिद्दीच्या बळावर साकारलेली ही यशोगाथा आहे महाबळेश्‍वर येथील भावेश भाटिया यांची. रविवारी (ता. १०) असलेल्या जागतिक दृष्टिदान दिनाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. एका कार्यक्रमासाठी ते पुण्यात आले होते. वडील जन्मापासूनच अंध. तोच अंधार भाटिया यांच्या वाट्याला आला. मुलगा अंध जन्मला म्हणून न खचता आईने त्यांच्याकडे सर्वसाधारण मुलाप्रमाणेच पाहिले. त्यांना शिक्षण दिले तेही सर्वसाधारण शाळेतच. सुरुवातीला आईच त्यांच्यासोबत शाळेत बसायची. लेखनिकामार्फत परीक्षा देत भाटिया यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच कर्करोगाने आईचे छत्र हरपल्याने भाटिया यांच्या मनावर मोठा आघात झाला.   

मुंबईच्या पुनर्वसन केंद्रात त्यांनी मेणबत्ती बनवायचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर पुन्हा महाबळेश्‍वर गाठून तिथेच त्यांनी व्यवसाय सुरू केला. दिवसभर मेणबत्त्या बनवायच्या आणि भाड्याने घेतलेल्या हातगाडीवर संध्याकाळी त्या विकायच्या. एका दांपत्याने त्यांना एका कंपनीत स्टॉल लावण्याची संधी दिली. त्यानंतर भाटियांनी मागे वळून पाहिलेच नाही. 

अल्पावधीतच त्यांनी मेणबत्त्यांचा कारखाना सुरू केला. पुढे १४ राज्यांत ७१ ठिकाणी त्यांनी उद्योगाचा विस्तार केला. हे करीत असताना त्यांनी आपल्यासारख्या शेकडो अंधांच्या हातांना काम दिले. महाबळेश्‍वरमधील कारखान्यात ९० अंध काम करीत आहेत. त्यांच्यासाठी भाटिया यांनी वसतिगृहही उभारले आहे.  

बाहेरून येणाऱ्या मेणबत्त्यांमध्ये रसायन वापरले जाते. मात्र, आम्ही मेणबत्तीसाठी लागणारा कच्चा माल शेतकऱ्यांकडूनच मागवतो. झाडावरून काढलेल्या मधातून मेण काढले जाते. त्यावर प्रक्रिया करून मेणबत्ती बाजारात आणली जाते.  
- भावेश भाटिया, उद्योजक

Web Title: Inspirational Success Story of Bhavesh Bhatia World Vision Day Special