विद्येच्या मंदिरासाठी 25 लाखांची वर्गणी! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

शिक्रापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी लोकवर्गणीतून 25 लाख रुपये खर्चून तीन मजली इमारत बांधण्याचा निर्णय बुरुंजवाडी (ता. शिरूर) ग्रामस्थांनी घेतला आहे. शाळेचे माजी विद्यार्थी व रक्षक रुग्णालयाचे संचालक, डॉ. अविनाश रंगनाथ रुके यांनी पाच लाखांची देणगी दिली आहे. उर्वरित लोकवर्गणी येत्या सहा महिन्यांत जमा करून पुढील वर्षात नव्या इमारतीत शाळा भरविण्याचा ग्रामस्थांचा इरादा आहे. 

शिक्रापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी लोकवर्गणीतून 25 लाख रुपये खर्चून तीन मजली इमारत बांधण्याचा निर्णय बुरुंजवाडी (ता. शिरूर) ग्रामस्थांनी घेतला आहे. शाळेचे माजी विद्यार्थी व रक्षक रुग्णालयाचे संचालक, डॉ. अविनाश रंगनाथ रुके यांनी पाच लाखांची देणगी दिली आहे. उर्वरित लोकवर्गणी येत्या सहा महिन्यांत जमा करून पुढील वर्षात नव्या इमारतीत शाळा भरविण्याचा ग्रामस्थांचा इरादा आहे. 

दुष्काळी असलेली बुरुंजवाडी सध्या आठमाही बागायती आहे. जेमतेम 1200 ते 1500 लोकसंख्या असलेल्या या गावातील जिल्हा परिषद शाळेची शिष्यवृत्तीच्या यशाची मोठी परंपरा आहे. शाळेतील जवळपास 250 मुले आत्तापर्यंत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकली आहेत. त्याचे बक्षीस म्हणून ग्रामस्थांनी शिक्षकांना दुचाकी व चारचाकी भेट दिल्या आहेत. गाव घडत असल्याने ग्रामस्थांनी शाळेसाठी नेहमीच योगदान दिले आहे. 

शाळेला सध्या नव्या इमारतीची गरज आहे. त्या पार्श्‍वभूमीवर ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी ग्रामसभा घेऊन सात वर्गखोल्या व एक मुख्याध्यापक कार्यालयासह तीन मजली इमारत लोकवर्गणीतून बांधण्याचा निर्णय घेतला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिक्रापुरातील रक्षक रुग्णालयाचे संचालक डॉ. अविनाश रुके यांनी लोकवर्गणीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी स्वत: पाच लाख रुपयांचा धनादेश देऊन लोकवर्गणीचा श्रीगणेशा केला. गावातून चार लाख रुपयांची लोकवर्गणी लवकरच शाळा व्यवस्थापनाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे. शाळेसाठी आणखी मदत देण्याची ग्वाही डॉ. रुके यांनी दिली आहे. 

दरम्यान, 2900 चौरस फुटांची एक अशा सात वर्गखोल्या बांधण्याचे नियोजन असून, पावर ग्रीड कंपनीही मदत करणार आहे. शाळेसाठी एलजी कंपनीने एक शौचालय बांधून दिले आहे. या सर्व सातही खोल्यांची उभारणी येत्या वर्षभरात करण्यात येणार आहे. गावातील प्रत्येक कुटुंबाने शाळा इमारतीसाठी योगदान देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती मुख्याध्यापक दादाभाऊ नळकांडे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र उमाप यांनी दिली. 

डॉ. रुके यांनी यापूर्वीही अनेकदा शालेय साहित्य, गणवेश वाटप, ई. लर्निंग संच, पुस्तके भेट दिली आहेत. सरपंच पूनम टेमगिरे यांच्यासह सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी इमारतीसाठी पुढाकार घेतल्याचे एस. पी. गीते, अण्णासाहेब गैंद, पी. व्ही. कुसळे, एस. पी. साळे या शिक्षकांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites Positive News Pune News