कैद्याच्या मेलेल्या मनात फुटला आशेचा अंकुर...

राजेंद्र सांडभोर
गुरुवार, 14 मार्च 2019

बंदूकधारी पोलिसांच्या निगराणीत विद्यापीठाचे पेपर द्यावे लागायचे. विचित्र नजरेने मुलं पाहायची. नंतर त्यांना सवय झाली. एकदा निबंध स्पर्धेत बक्षीस मिळाले. हातात बेडी घालून ते स्वीकारायला जाण्याचा योग आला. संयोजक संकोचले; पण मी म्हटले बेडीच माझा वर्तमान असून, तो मी स्वीकारलेला आहे.
- सतीश शिंदे

राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले आणि एक नव्हे...दोन नव्हे...तब्बल 4 पदव्या आणि 8 पदविका, असे 12 अभ्यासक्रम तुरुंगातून पूर्ण करण्याची अनोखी जिद्द दाखवून दिली आहे. खेड तालुक्‍यातील रानमळा गावातील एका कैद्याने...सतीश मुरलीधर शिंदे हे त्यांचे नाव!

राजगुरुनगर येथे बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर सामान्य शेतकरी कुटुंबातील शिंदे यांनी उपजीविकेसाठी सन 1994 मध्ये मुंबईची वाट धरली. तेथे नोकरी करताना ओळखीतून महाड येथे एका बांधकाम व्यावसायिकाकडे "साइट सुपरवायझर' म्हणून काम मिळाले. एक दिवस त्या बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदाराला गाडीतून आणण्यासाठी त्यांना पाठविले. ते भागीदार आणि त्याच्या पत्नीला गाडीतून घेऊन येत होते. त्या वेळी संबंधित बांधकाम व्यावसायिक मारेकऱ्यांच्या मदतीने भागीदार व त्याच्या पत्नीचा खून करतो. मात्र, या कटात सहभागाचा आरोप ठेवून अटक, खटला प्रक्रिया होऊन वयाच्या 25 व्या वर्षी शिंदे यांना जन्मठेप होते. 4 वर्षे 2 महिने 10 दिवस त्यांना कल्याण आणि अलिबाग तुरुंगामध्ये "अंडर ट्रायल' काढावे लागतात. त्याठिकाणी या परिस्थितीतही योग्य काहीतरी करायचे, असे ते मनोमन ठरवितात.

जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होऊन 17 जून 2005 रोजी अलिबागहून त्यांची रवानगी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात होते आणि 21 जूनला ते कारागृहांतर्गत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्रात पहिल्या वर्षाला प्रवेश घेतात. त्यावर्षी फर्स्टक्‍लास फर्स्ट उत्तीर्ण होतात. यशाचे मार्गक्रमण पुढे चालूच राहते आणि सन 2008 मध्ये ते अर्थशास्त्रात बी.ए. होतात. गणिताची आवड असल्याने अर्थशास्त्र विषय घेतला, असे ते सांगतात. त्यांनी एम.एस्सी. व्हावे, असे त्यांच्या मामांचे स्वप्न होते. ते शक्‍य नव्हते; पण काहीतरी पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे ठरवितात. मात्र, तेव्हा कारागृहात ती सोय नव्हती. तुरुंगातून रजेवर आल्यावर त्यांनी पुणे विद्यापीठात चौकशी करून एम.ए.साठी बहिःस्थ विद्यार्थी व्हायचे ठरविले. त्यासाठी कारागृह पोलिस महानिरीक्षकांची परवानगी घ्यावी लागली.

एम.ए.साठी त्यांचे भाऊ पोस्टाने पुस्तके पाठवायचे. तसेच, रजेवर आल्यावरही ते गावाहून पुस्तके न्यायचे. यथावकाश सन 2010 एम.ए. झाले; पण थांबायचे त्यांच्या मनात नव्हते. त्यांनी इंटरनेटवरून बहिःस्थ म्हणून शिकता येईल, अशी शासनमान्य शिक्षणसंस्था शोधली. मुंबई विद्यापीठाला संलग्न असलेल्या वेलिंगकर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि लागोपाठ आठ वर्षांत आठ पदविका पूर्ण केल्या. तसेच, दरम्यान समाजशास्त्रात बी.ए. व राज्यशास्त्रात एम.ए. या पदव्याही घेतल्या. कारागृहातच संगणक शिकले. इंग्रजी बोलायला शिकले. सर्वकाही एकलव्यासारखे विनाशिक्षक!

पुढे मध्यवर्ती कारागृहातून पुण्याच्या येरवड्याला खुल्या कारागृहात आले. तेथे शेतीसंबंधी कामेही केली. कारागृह प्रशासनाने 7 एकरांवर मंगल कार्यालय बांधायचे ठरविले. त्याचे बहुतांश कामकाज यांनीच पाहिले. तब्बल साडेसतरा वर्षे तुरुंगात घालविल्यावर 14 सप्टेंबर 2018 रोजी त्यांची मुक्तता झाली. चांगल्या वर्तुवणुकीबद्दल त्यांची 8 वर्षे 6 महिने 18 दिवस शिक्षा माफ करण्यात आली. आता ते कारागृहातून सुटणाऱ्या बंद्यांसाठी काम करणाऱ्या नवजीवन मंडळात नोकरी करीत आहेत. कैद्यांसाठी काम करण्याच्या इच्छेमुळेच त्यांनी हे काम स्वीकारले आहे.

शिंदे यांनी पूर्ण केलेलं अभ्यासक्रम
बी.ए. (अर्थशास्त्र), बी.ए. (राज्यशास्त्र), एम.ए. (अर्थशास्त्र), एम. ए. (राज्यशास्त्र), डिप्लोमा इन फिनान्शियल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट, डिप्लोमा इन आंत्रप्युनरशिप मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बॅंकिंग, डिप्लोमा इन इंडस्ट्रिअल मॅनेजमेंट.

सकारात्मक दृष्टिकोन
एवढे सर्व भोगूनही शिंदे यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. तुरुंग, पोलिस, कैदी, गुन्हेगार, वकील अशा लोकांशी संबंध येऊनही शिंदे म्हणतात, ""मला आयुष्यात एकही वाईट माणूस भेटला नाही. या वर्षांमध्ये सुमारे 25 हजार बंदी भेटले; पण एकही माझ्याशी चुकीचा वागला नाही. मी शिकत असताना कुणीही त्यात अडथळा आणला नाही किंवा त्रास दिला नाही. अधिकाऱ्यांनी मदत केली. म्हणून माझ्या यापुढच्या उत्पन्नातील काही हिस्सा कारागृहातल्या बंद्यांसाठी खर्च करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना लग्नासाठी स्थळ आले. त्यांनी मध्यस्थाला स्पष्ट सांगितले की, माझी जशीच्या तशी माहिती द्या. काहीही लपवू नका. अशा परिस्थितीतही कुटुंबीयांनी आणि विशेषतः आईने विश्वास ठेवला म्हणून ते त्यांचे ऋण व्यक्त करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: prisoner satish shinde complete 12 courses at jail