चिमुकल्यांनी केली वृद्धांची दिवाळी गोड

संदीप जगदाळे
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मोझे प्रशालेचे विदयार्थी खाउच्या पैशातून काटकसर करतात. या पैशातून दरवर्षी ब्लॅंकेटस खरेदी करतात. थंडीच्या दिवसात रसत्यावर झोपणारे, अनाथ, निराधार लोकांना वाटप करून त्यांना मायेची उब देतात. दरवर्षी दहावीच्या परीक्षेच्या विदयार्थ्यांना लेखनिक म्हणून मदत करतात. विशेष शाळेतील विदयार्थी, अनाथाश्रमातील मुले यांच्यासोबत रक्षाबंधन, रंगपंचमी साजरी करून समाजातील या दुर्लक्षीत घटकांशी नाते जोडून मैत्रीचा धागा बांधतात. यातून बालवयातच सामाजिक जाणिव व समाजाचे आपण देणे लागतो याची जाणिव निर्माण व्हावी व संस्कार व्हावेत, यासाठी शाळा व त्यांचे पालक नेहमीच प्रोत्साहन देतात.

हडपसर (पुणे): गेनबा सोपानराव मोझे प्रशालेतील प्रत्येक चिमुकल्या विदयार्थ्यांने घरून ओंजळभर अन्न-धान्य आणले. ते शाळेने एकत्र केले. दिवाळीचे औचित्य साधत हे साहित्य हडपसर येथील सिध्दी वृध्दाश्रमातील वृध्दांना भेट देवून त्यांची दिवाळी गोड केली.

यावेळी मुलांनी निराधार वृध्द आजींशी संवाद साधून त्यांचे सुख-दुःख जाणून घेतले. आजींना नातवंडे मिळाल्याने मोठया कौतूकाने व मायेने मुलांच्या पाठीवरून आपल्या थरथरत्या हातांनी पाठ थोपटली. जगात आपले कोणीही नाही, मात्र, या चिमुकल्या नातवंडांनी आपली दखल घेतली. त्यामुळे वृध्दाश्रमातील अनेक आंजीच्या कंठ दाटून आला, डोळ्यात आनंद आश्रू तररले. हे पाहून मुले व त्यांच्यासोबत असलेल्या शिक्षक देखील भावनाविवश झाले.

एकीकडे आपण सर्वजण आनंदात दिवाळीचा सण साजरा करत असताना वृध्दाश्रमातील अनेक आजींच्या जीवनात एक आशादीप आपण उजळू शकलो, याची अनुभती यानिमित्ताने मुलांना आली. प्रकाशाच्या या सणानिमित्त विदयार्थ्यांचे मन अंतर्बाह्य उजळून निघाले.

वृध्दाश्रमातील आजी हिराबाई शिंदे म्हणाल्या, 'या चिमुकल्या नातवंडाच्या दातृत्वांची ओंजळ आमच्या हृदयात कायम राहिल. नातेवाईक नसल्याने आम्ही एकटे आहोत, असे मला वाटत होते. मात्र, या मुलांना भेटल्यानंतर मला माझी नातवंडेच मिळाली आहेत. त्यामुळे मला खूप आनंद झाला. या मुलांचे देव कल्याण करो.'

विदयार्थ्यांनी गहू, तांदूळ, तुरडाळ, हरबरा डाळ, मूगडाळ, साखर, साबण, तूप, रवा, मैदा, गुळ, सुंगधी उटणे, पाठीसाखर, ज्वारी, बाजरी, असे साहित्य वृध्दाश्रमाला भेट दिले. तसेच शाळेतील शिक्षिका उज्वला यादव यांच्यातर्फे प्रत्येक आजीला नवीन साडया वाटप करण्यात आल्या.

याप्रसंगी गेनबा सोपानराव मोझे प्रशालेचे प्राचार्य संजय सोमवंशी, शाळा समिती अध्यक्ष अलकाताई पाटील, पर्यवेक्षक मारूती दुसगडे, सुलभा इथापे, सुजाता जगताप, रघुनाथ रांघवन, सुलक्षणा जाईल, अनिनाश महापुरे, संजय जैनक, सुवर्णा नरवडे उपस्थित होते.

वास्तविक पाहता या शाळेतील बहुतांश विदयार्थी श्रमजीवी कामगार, मोलमजूरी, आर्थीक दृष्टया दुर्बल घटकातील आहेत. त्यांच्यामध्ये समाजाप्रती असणारी कणव आणि दानाचे त्यांच्यावर बालवयातच संस्कार घरातून आणि शाळेकडून केले जातात. घरची परिस्थीती नाजूक असतानाही गरजू व दुर्बल घटकातील लोकांची दिवाळी गोड करून समाजासाठी खारीचा वाटा उचलणा-या या विदयार्थ्यांचा प्रयत्न समाजासाठी अनुकरणीय आहे. गेल्या दहा वर्षापासून समाजिक बांधिलकी जोपसात निराधार, अनाथ, बेवारस आणी गोरगरिबाची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या शाळेतील विदयार्थी करतात.

मोझे प्रशालेचे प्राचार्य संजय सोमवंशी म्हणाले, 'मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाउ मोझे, उपाध्यक्ष ज्ञानेश्र्वर मोझे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहान अशा सामाजिक कामासाठी आम्हा विदयार्थी व शिक्षकांना नेहमीच मिळते. यातून भावी पिढी सुसंकृत व चारित्र्य संपन्न नागरिक घडण्यास मदत होते.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news moze prashala student help Siddhi Vriddhashram diwali