हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना देणार 15 लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

औरंगाबाद - ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20) शिऊर (ता. वैजापूर) येथे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्याची सर्व तयारीही झाली; पण पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 भारतीय जवान हुतात्मा झाले. या घटनेची दखल घेत स्वागत समारंभाचे नियोजित दोन्हीही कार्यक्रम रद्द करीत त्यावरील खर्च होणारे 15 लाख रुपये हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय जिल्ह्यातील जाधव कुटुंबीयांनी घेतला.

भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांचा मुलगा अभिषेक यांचा 13 फेब्रुवारीला ग्वाल्हेर येथे विवाह झाला. यानंतर हे स्वागत समारंभ आयोजित केले होते. यासाठी सर्व व्यवस्था पूर्वीच करण्यात आली होती. मात्र, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हे दोन्ही समारंभ रद्द करून, त्यावर होणाऱ्या खर्चाची रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय जाधव कुटुंबीयांनी घेतला.

पुलवामा येथे झालेल्या जवानांवरील हल्ल्यामुळे स्वागत समारंभ रद्द केला. पंचतारांकित हॉटेलला दिलेल्या एकूण रकमेपैकी रद्द शुल्क कपात करून, त्यांच्याकडून उर्वरित रकमेची मागणी केली आहे. मदतीचा धनादेश उद्या (सोमवारी) जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार आहोत.
- एकनाथ जाधव, जिल्हाध्यक्ष, भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 15 Lakh Donate to martyr Family Motivation Humanity